Published on
:
24 Nov 2024, 11:26 am
Updated on
:
24 Nov 2024, 11:26 am
कळता क्षणी कुणाच्याही सुख-दुःखाला धाऊन जाणारा सर्वसामान्यांचा मित्र अशी ओळख असलेल्या, तसेच वक्तृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व अशा तिन्ही गुणांची परिपक्वता असलेल्या रविंद्र चव्हाण यांनी सुशिक्षितांच्या सांस्कृतिक डोंबिवलीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेल्या 15 वर्षांपासून डोंबिवली शहरावर आपली हुकूमत कायम ठेवणाऱ्या रविंद्र चव्हाण यांनी यावेळीहा चौथ्यांदा 76 हजार 896 मताधिक्य मिळवून सर्व जात-धर्म-प्रांतीयांसह संघ परिवार आणि भाजपाचे निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे.
नागरी समस्या आणि विकास कामांच्या विषयांवर वारंवार विविध प्रश्न उपस्थित करून उबाठाचे दिपेश म्हात्रे यांनी रविंद्र चव्हाण यांना या निवडणुकीत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या पंधरा वर्षांत डोंबिवली नगरीतील मतदारांपर्यंत पाळेमुळे घट्ट रोवलेल्या चव्हाण यांनी म्हात्रे यांचे आव्हान मोडून काढत शहराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक घटकापर्यंत असलेले मैत्री आणि सलोख्याचे संबंध कायम ठेवण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे. आपला विजय हा एका विचारधारेचा, महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा, लाडक्या बहिणींनी दिलेल्या साथीचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाचा विजय असल्याची प्रतिक्रया रविंद्र चव्हाण यांनी विजयोत्सव साजरा करताना प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. रविंद्र चव्हाण यांना 1 लाख 23 हजार 427, तर दिपेश म्हात्रे यांना 46 हजार 531 मते मिळाली.
विशेष म्हणजे शक्तिशाली नेता म्हणून डोंबिवली विधानसभेचा उमेदवार, भाजपाचा स्टार प्रचारक आणि स्वत:च्या डोंबिवली मतदार संघाव्यतिरिक्त पालघर जिल्ह्यासह कोकणात महायुतीन दिलेल्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली होती. मंत्री पदावर असताना गेल्या पंधरा वर्षांतील विकासकामांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या स्वपक्षासह संघ परिवारातील काही मंडळींनी चव्हाण यांच्या विरोधात, तर काहींनी उघडपणे काम केल्याच्या तक्रारी होत्या. मात्र पक्षीय मतभेद विसरून याच चव्हाण यांनी शिवसेनेतील काही दिग्गज नगरसेवकांसह पश्चिम डोंबिवलीतील काही नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. यातील काहींनी निवडणुकीच्या तोंडावर चव्हाण यांना शब्द देऊन नंतर दीपेश म्हात्रे यांच्यासाठी काम सुरू केल्याच्या चर्चा सुरू होत्या. पश्चिम डोंबिवलीतील आगरी समाजाचे नगरसेवक आणि समाज दिपेश म्हात्रे यांना साथ देत असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. एकीकडे मुलासाठी वडील पुंडलिक म्हात्रे यांच्यासह सर्व कुटुंबीय, नातेवाईक आणि आगरी समाजातील आप्तेष्ट दिपेश यांच्यासाठी प्रचार करत होते. शिवाय दुसरीकडे कोकणी/मालवणी बहुल पट्ट्यातील मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न उबाठाच्या कार्यकर्त्यांनी केला. तथापी या सगळ्या आव्हानांना तोंड देत रविंद्र चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुप्तपणे प्रचार प्रवाहीत ठेऊन कुठेही आपल्याकडून आगळीक होणार नाही, याची काळजी घेतली होती.
डोंबिवली फास्ट ते डोंबिवली फर्स्ट हा वसा घेऊन निघालेल्या रविंद्र चव्हाण यांच्या रॅल्यांना प्रचाराच्या शेवटपर्यंत उदंड प्रतिसाद मिळत होता. शांतताप्रिय डोंबिवलीच्या उन्नतीसाठी डोंबिवली फास्ट ते डोंबिवली फर्स्ट हा वसा हाती घेऊनच काम करत असल्याच्या भावना व्यक्त करणाऱ्या रविंद्र चव्हाण यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिपेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांकडून रविंद्र चव्हाण यांच्या विषयीच्या वेगवेगळ्या ध्वनी-चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. तथापी या सगळ्याचा अत्यंत संयम बाळगून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सामना केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात ठेच लागलेल्या मतदारांनाही यावेळी मात्र संघटित करण्यात महायुतीचे कार्यकर्ते यशस्वी ठरले. डोंबिवली हा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला. शहरातील एकगठ्ठा असलेला हा मतदार सुरक्षित ठेवण्यात भाजपाची तरूण फळी आणि महायुतीचे कार्यकर्ते यशस्वी झाले. आता फसलात तर पुढे बुडालात ? असा सुप्त प्रचार महायुतीकडून सुरू होता. लोकसभा निवडणुकीनंतर समाज माध्यमांतील विशिष्ट चित्रफिती पाहून हिंदू मतदार एकटवला. या सगळ्या ताकदीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 86 हजारापर्यंत मते घेणाऱ्या रविंद्र चव्हाण यांनी यावेळी 1 लाख 23 हजारांचा पल्ला गाठून होय हिंदुत्वासाठी जिंकलो हे दाखवून दिले आहे.
रविंद्र चव्हाण यांना मानणारा आगरी समाजासह मराठा, कोकणी, मालवणी, गुजराथी, मारवाडी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय समाज देखिल या निवडणुकीत सहकार्य करण्याचे दिसून येते. एखाद्या मतदार संघात एकदा उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा निवडून येतात. तेव्हा तो मतदार संघ त्याचा बालेकिल्ला बनून जातो. मंत्री रविंद्र हे सलग तीनदा या मतदार संघातून निवडून आले आहेत. आता चौथ्यांदा त्यांनी बाजी मारली आहे. चव्हाण यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा, आदी क्षेत्रातील संस्था-संघटनां प्रत्येक पक्षातील राजकीय मंडळींशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. याशिवाय चव्हाण यांनी शहरासाठी भरघोस निधी आणून रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांची नेहमीच चालना असते. डोंबिवली ही सुशिक्षितंची सांस्कृतिक नगरी आहे. विविध कार्यक्रम चव्हाण यांच्या पुढाकाराने होत असतात. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातही ते लोकप्रिय आहेत.
पश्चिम डोंबिवली 40 हजारांचे मताधिक्य
विधानसभा निवडणूकीत राज्यातील प्रचाराची जबाबदारी पक्षाने चव्हाण यांच्या खांद्यावर टाकली होती. त्यामुळे त्यांना स्वत: च्या प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही. तथापी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चव्हाण यांचा प्रचार झाला. या निवडणूकीत आगरी कार्ड चालेल असं धोका चव्हाण यांना वाटत होता. मात्र हे कार्ड फारसे चाललेले नाही. पश्चिम डोंबिवलीत मताधिक्य कमी होईल, अशी चव्हाण यांना धास्ती होती. मात्र उलट चव्हाण यांना 40 हजारांचे मताधिक्य पश्चिमेतून मिळाले आहे. चव्हाण यांचा सर्वाधिक प्रचार पश्चिम डोंबिवलीत झाला. रेल्वे स्थानकांचा केलेला कायापालट आणि अनधिकृत टपऱ्या हटविल्याने रेल्वे प्रवाशांसह रहिवाशांच्या अधिक पसंतीस उतरले.