सालेकसा (Gondia):- दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने ७५ वर्षीय जन्मदात्री आईने दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागावरून तिची कुर्हाडीने घाव घालून हत्या केली. यानंतर विहिरीत उडी घेवून स्वत:ची जीवन यात्रा संपविली. ही घटना १५ नोव्हेंबरच्या दुपारदरम्यान कुणबीटोला येथे घडली. या घटनेने सालेकसासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या (Suicide)करण्यापूर्वी त्याने एका पत्रात क्षमा याचनाही केली. सुलकनबाई फत्तेलाल बनोठे (७५) व लेखराज फत्तेलाल बनोठे (५४) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत.
आत्महत्येपूर्वी चिट्टीतून क्षमायाचना कुणबीटोला येथील घटना
सविस्तर असे की, सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील लेखराज फत्तेलाल बनोठे हा वृध्द आई सुलकनबार्ई फत्तेलाल बनोठे हिच्यासोबत राहत होता. लेखराज हा दारूच व्यसनी (Alcohol addict) होता. दरम्यान लेखराज याने आई सुलकनबाई हिला दारूसाठी पैसे मागितले. यावर आईने पैसे देण्यास नकार दिला. दारूच्या आहारी गेलेल्या लेकराजने पैसे न दिल्याचा राग धरून वृध्द आईची कुर्हाडीने घाव घालून हत्या (Murder) केला. यानंतर घटनेचा प्रायश्चित म्हणून त्याने ‘मी तुझी हत्या केली, मला क्षमा कर’ असे पत्र लिहून घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही बाब उघडकीस येताच कुणबीटोलासह परिसरात एकच खळबळ उडाली. फिर्यादी गजेंद्र फत्तेलाल बनोठे (३४) याच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.