विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस बाकी असताना नागपुरात एक अनपेक्षित घटना घडली आहे. नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या रोड शोदरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरसमोर आले आहेत.
काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांचा नागपूर मध्य मतदारसंघात भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं. पण या रोड शोला गालबोट लागणारी घटना आज घडली. प्रियंका गांधी यांचा रोड शो संपत असतानाच संबंधित परिसरात एका चौकात भाजप कार्यकर्ते तिथे आले. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचं काम केलं. पण तरीदेखील भाजप कार्यकर्त्यांकडून पक्षाचा झेंडा फडकवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.
संबंधित घटना जिथे घडली तो परिसर संघ मुख्यालयाचा परिसर आहे. या परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून प्रियंका गांधी यांच्या रोड शोला विरोध करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे झेंडे दाखवत निदर्शने केली. सुरुवातीला भाजप कार्यकर्त्यांकडून इमारतींवरुन झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर आले. कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
हे सुद्धा वाचा
पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्यात ही राजकीय लढाई आहे. प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. असं असताना आज नागपूर मध्य मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळत आहे. दोन्ही बाजूने प्रचंड शक्ती प्रदर्शन आणि घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. घटनास्थळी कार्यकर्त्यांची गर्दी पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.