Published on
:
17 Nov 2024, 12:25 pm
Updated on
:
17 Nov 2024, 12:25 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या ग्लोबल साऊथ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या तीन देशांना भेट देणार आहेत. पीएम मोदी रविवारी (दि. 17) नायजेरियात अबुजा येथे पोहोचले. तीन देशांच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून नायजेरियाला त्यांचा पहिला दौरा असून ते ब्राझील आणि गयाना येथेही जाणार आहेत. 17 वर्षांत पश्चिम आफ्रिकन राष्ट्राला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या आगमनानंतर नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांनी मोदींचे अबुजा विमानतळावर जोरदार स्वागत केले. (pm modi nigeria marathi community)
यावेळी विमानतळावर जमलेल्या मराठी समुदायानेही पीएम मोदींचे जल्लोषात स्वागत केले. ‘नायजेरियातील मराठी समुदायाचे असे उत्साही स्वागत करताना पाहून मनाला आनंद झाला!’ अशी पतिक्रिया पीएम मोदींनी एक्सच्या पोस्टमधून दिली आहे.
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून पश्चिम आफ्रिकेतील आमचा जवळचा भागीदार असलेल्या नायजेरियाला माझी ही पहिली भेट आहे. ही भेट म्हणजे आमच्या धोरणात्मक भागीदारी वाढवण्याची संधी असेल. लोकशाही आणि बहुलवादावरील सामायिक विश्वासावर आधारित मी भारतीय समुदाय आणि नायजेरियातील मित्रांना भेटण्यास उत्सुक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी नायजेरियातील मराठी समुदायाचे कौतुक केले आहे. मराठी बांधव आपले मूळ आणि संस्कृतीशी जोडले गेले आहेत याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी बांधवांनी आनंद व्यक्त केला आणि पीएम मोदी यांचा सत्कार केला.
याबद्दल माहिती देताना पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये लिहिले की, नायजेरियातील मराठी समुदायाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते आपल्या संस्कृतीशी किती जोडले गेले आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे.’
In Nigeria, the Marathi community expressed joy at Marathi being conferred the status of a Classical Language. It is truly commendable how they remain connected to their culture and roots. pic.twitter.com/hVDVykAGi2
— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2024