Hingoli Assembly Election: विधानसभा निवडणूक कालावधीत आचार संहितेचे काटेकोर पालन करावे: जिल्हाधिकारी अभिनव गोयल

2 hours ago 1

हिंगोली (Hingoli Assembly Election) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व विभागांनी या निवडणुकीत प्राधान्यक्रम आणि तातडीने करावयाची कार्यवाही करावी. तसेच संपूर्ण निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व विभागप्रमुख आणि जिल्हास्तरीय पथक प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली मतदारसंघात दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून मतमोजणी विविध टप्प्यावर अनुषंगीक कार्यवाही करण्यात यावी. आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींचे छायाचित्र किंवा नाव हटविण्याची प्रक्रिया तातडीने करण्यात यावी. तसेच कार्यालयांनी त्यांच्याकडील सुरु असलेली कामे आणि पूर्ण झालेली कामे यांची माहिती तातडीने सादर करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. निवडणूक कालावधीत शासकीय वाहनांचा दुरुपयोग होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येतील. या प्रशिक्षणादरम्यान (Hingoli Assembly Election) निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मतदानाची सोय करण्यात आली आहे. यावेळी सेवेत असणाऱ्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचे मतदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनची पुरेशी उपलब्धता आहे. या मशिनची तपासणी केल्यानंतरच विधानसभानिहाय वाटप करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पुरेशा सोयी उपलब्ध करुन देण्यात याव्यात. हिंगोली जिल्ह्यात 92-वसमत विधानसभा मतदारसंघात 327, 93-कळमनुरी 345 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 343 असे जिल्ह्यात एकूण 1 हजार 15 मतदान केंद्र राहणार असून यातील निम्म्या मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.

मतदानाचा टक्का वाढावा आणि नागरिकांचा निवडणुकीत (Hingoli Assembly Election) सक्रीय सहभाग नोंदवावा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या भागात जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच 85 वर्षे वय आणि दिव्यांग मतदार मतदान केंद्रावर येण्यास सक्षम नसल्यास त्यांना घरुन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे रितसर मागणी नोंदवावी लागणार आहे. नियमानुसार चित्रिकरण करुन संबंधित व्यक्तीचे मतदान करुन घेण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. नागरिकांनी तक्रारीसाठी सी व्हीजील, व्होटर हेल्पलाईन, नो युवर कँडिडेट यासारखी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. (Hingoli Assembly Election) निवडणुकीची सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणांनी वेगाने कामकाज पार पाडावे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेल्या कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी सुरु करावी. सर्व भरारी पथकांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असून, एसएसटी, एफएसटी अशी भरारी पथके तात्काळ कार्यान्वित करावीत. निवडणूक प्रक्रियेमध्ये सी- व्हिजील अँपचा प्रभावी वापर होणार असून, या ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबत वेळेत कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेच्या काळात चोख कारवाई करुन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.

सर्व समितीच्या पथक प्रमुखांनी वेगाने कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आचारसंहितेच्या अनुषंगाने वेळेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सर्व संबंधितांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय इमारती, होर्डींग्जवरील संदेश, पोस्टर, झेंडे, पताका त्वरीत काढून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. प्रभाग अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रभागाची पाहणी करुन नव्याने, फलक लावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. (Hingoli Assembly Election) सभेसाठी परवानगी देताना जो प्रथम येईल व आवश्यक ते शुल्क भरेल त्याच व्यक्तीला प्राधान्याने परवानगी देण्याची कार्यवाही करावी. सद्या सुरु असलेली कामे सुरु ठेवावीत, परंतु नवीन कामे सुरु करू नयेत.

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट रॅण्डमायझेशनची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून, सर्व संबंधित यंत्रणांना याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच सर्व मतदान केंद्रांना निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन ते सुव्यवस्थित असल्याबाबत आणि आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी. मतदान केंद्रांवरील फर्निचर, लाइट, पाणी, रॅम्प, खिडक्यांची दुरुस्ती करुन घ्याव्यात. तसेच मतदान केंद्र परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी दिले.

यावेळी आदर्श आचारसंहिता पथकाचे पथक प्रमुख नामदेव केंद्रे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत माहिती दिली. तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी निवडणूक कालावधीत करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.
यावेळी सर्व विविध समित्यांचे जिल्हास्तरीय पथक प्रमुख आणि खाते प्रमुखांची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article