* जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची पत्रकार परिषेदत माहिती
हिंगोली(Hingoli) :- जिल्ह्यात भयमुक्त व कायदेशीर मार्गाने निवडणूक पार पाडावी यासाठी सर्वत्र पोलीस यंत्रणेला अलर्ट ठेवले आहे. निवडणूक प्रचारा दरम्यान वाहन तपासणीसह अवैध दारू, पैसे, जेवण व इतर भेटवस्तू वाटप होत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई (action) केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत (Press conference) दिली.
विधानसभा मतदार संघ निहाय विशेष पथकाची स्थापना
पोलीस अधिक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूक निमित्ताने सध्या आदर्श आचार संहिता लागू आहे. २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात भयमुक्त व कायदेशीर मार्गाने निवडणूक होण्याकरीता विधानसभा मतदार संघ निहाय विशेष पथकाची स्थापना केली आहे. यामध्ये पोलीस हवालदार ग्यादलवाड, जाधव, बटालीयन एम.पी.कमांडरचे चार जवान, दुसर्या पथकात सपोउपनि नागरे, चव्हाण, तिसर्या पथकात बाबर शेख, कमांडर प्रेमनारायण सिंह, चौथ्या पथकात बाभळे, कमांडर गौस्वामी, पाचव्या पथकात घोंगडे यांच्यासह कमांडर तिग्गा अशोकसिंह, सहाव्या पथकात संजय राठोड, सशस्त्र बलमधील प्रितम लाल, सातव्या पथकात दिलीप पोले यांच्यासह बलवान, आठव्या पथकात सोपान सांगळे यांच्यासह विनोद रामभगत, नवव्या पथकात गुलाब जाधव यांच्यासह विजय लोदार, दहाव्या पथकात रवी इंगोले यांच्यासह लालबहाद्दूर, अकराव्या पथकात रोहिदास राठोड यांच्यासह हारूण, बाराव्या पथकात पोलीस उपनिरीक्षक घुले, सपोउपनि वाठोरे, खोकले, तेराव्या पथकात पोलीस उपनिरीक्षक जमादार राठोड, तुरूकमाने, शेख, चौदाव्या पथकात पोलीस उपनिरीक्षक आडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे, हाके व पंधराव्या पथकात पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांचा समावेश आहे. हे पथके गावागावामध्ये जाऊन निवडणूक संदर्भाने आलेल्या तक्रारीबाबत तात्काळ भेट देऊन त्या तक्रारीचे निवारण करणार आहेत.
प्रचारा दरम्यान घेण्यात येणार्या सभा, बैठका, प्रचार रॅली, दौरे आदींची कायदेशीर परवानगी
तसेच उमेदवार, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून प्रचारा दरम्यान वाहनांची तपासणी, अवैध दारू, पैसे, जेवण व इतर भेटवस्तू वाटप करीत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. प्रचारातील वाहने योग्य परवानगी घेऊन फिरत आहेत का, तसेच प्रचारा दरम्यान घेण्यात येणार्या सभा, बैठका, प्रचार रॅली, दौरे आदींची कायदेशीर परवानगी घेतली आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाणार, एखाद्या वाहनावर बेकायदेशीररित्या राजमुद्रा लावलेली असल्यास तसेच कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कारवाई होत असल्यास त्याचवेळी प्रतिबंध घातला जाईल, गावागावामध्ये सतत पेट्रोलिंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांची उपस्थिती होती.
निवडणूक संपण्या अगोदर ७२ तासात घ्यावी लागणार खबरदारी
सर्व राजकीय पक्षाने निवडणूक संपण्या अगोदर ७२ तासात काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार, ज्यामध्ये राजकीय पक्षाने त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी घेणे, कार्यक्रमाची पूर्व माहिती पोलीस तसेच निवडणूक विभागाला कळविणे, मंगलकार्यालय, धर्मशाळा, फार्महाऊस यांनी त्यांच्याकडे आयोजित होणार्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना पोलीस व निवडणूक विभागात देणे, हॉटेल, लॉजेस, ढाब्यावाल्यांनी त्यांच्याकडे येणार्या-जाणार्या व्यक्तींची खात्री करावी, हॉटेल, ढाबा, लॉजेसमध्ये बेकायदेशीर काम चालणार नाही याबाबत लक्ष द्यावे, पुढील ७२ तासात मोठ्या प्रमाणात वाहने तपासणी होणार असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, अनावश्यक वाद टाळावा, कोणत्याही व्यक्तीश किंवा राजकीय पक्षाला निवडणूक संदर्भाने कोणतेही कार्य बेकायदेशीर वाटल्यास त्यांनी त्यांची तक्रार सीव्हीजल अॅपवर टाकावी, तसेच माहिती निवडणूक विभाग व पोलिसांना द्यावी, सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे, ज्या व्यक्तीला शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली आहे. त्यांनी अनावश्यक शस्त्राचे प्रदर्शन टाळावे, या कालावधीत चुकीची खोटी दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्याच्या विरूद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.