हिंगोली(Hingoli) :- शहरातील पुरातनकालीन जलेश्वर तलावाचे सुशोभिकरण(beautification) मागील काही महिन्यापासून सुरू आहे. तलावालगत चोहीबाजूने संरक्षण भिंतीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सदरील कामे पूर्ण झाल्यानंतर जलेश्वर तलावाचा पूर्णपणे कायापालट होणार आहे.
कोट्यावधी रूपयांचा विकास निधीतून कामे
हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव सुशोभिकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर अनेक विकासाची कामे मागील काही महिन्यापासून सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये या तलावातील गाळ टिप्पर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून नेवून शेतामध्ये टाकण्यात आला. हजारो वाहनातून प्रत्येक दिवशी हा गाळ उपसा करून नेण्यात आला. तलावातील गाळ काढल्यानंतर तलावांतर्गत अनेक कामे सुरू करण्यात आली. यासोबतच तलावाच्या चोहीबाजूने संरक्षणाकरीता संरक्षण भिंत उभारण्याचे कामही मागील काही महिन्यापासून सुरू आहे. टप्याटप्याने चोहीबाजूने संरक्षण भिंत उभारली जात आहे. अंबिका टॉकीज ते गवळीपुरा भागातील तलाबकट्टा मस्जिदपर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामालाही सुरूवात झाली आहे. देवडा प्रेस पर्यंत या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या सर्व कामाला शासनाकडून कोट्यावधी रूपयाचा निधी प्राप्त झाल्याने त्यातून ही कामे केली जात आहेत.
सुशोभिकरणामुळे तलावाचा कायापालट
जलेश्वर तलावाचे सुशोभिकरण केले जावे ही हिंगोलीकरांची मागणी अनेक वर्षापासून आहे. याच तलावामध्ये पुरातनकालीन जलेश्वर मंदीरही आहे. जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाला शासनाकडून कोट्यावधी रूपयाचा निधी प्राप्त झाल्याने त्यातून अनेक विकास कामे केली जात आहेत. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर संपूर्णत: तलावाचा कायापालट होणार आहे.