भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्स विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 249 धावांचं आव्हान भारताने 38.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. रोहित शर्मा याने या सामन्यात फलंदाज म्हणून पुन्हा निराशा केली. रोहित अवघ्या 2 धावा करुन माघारी परतला. मात्र कर्णधार म्हणून रोहितने या विजयानंतर काय म्हटलं? विजयाचं श्रेय कुणाला दिलं? हे जाणून घेऊयात.
श्रेय सर्व गोलंदाजांना
हा फॉर्मेट थोडा मोठा असल्याने कमबॅक करण्यासाठी वेळ असतो. जेव्हा तुमच्या बाजूने काही घडत नसतं तेव्हा तुमच्या बाजूने काहीच होणार नाही, असं नाही. तुम्हाला कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, आम्ही नेमकं तेच केलं. याचं संपूर्ण श्रेय हे गोलंदाजांना जातं. सर्वांनी या विजयात योगदान दिलं. आमच्यासाठी हे असंच सुरु ठेवणं महत्त्वपूर्ण आणि गरजेचं होतं”, असं रोहितने म्हटलं.
विजयाचा खरा हिरो कोण?
रोहितने ऑलराउंडर अक्षर पटेल यांचं कौतुक केलं. अक्षरने पाचव्या स्थानी येत टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी केली. अक्षरने 47 बॉलमध्ये 52 धावा केल्या.
हे सुद्धा वाचा
“आम्हाला मिडल ऑर्डरमध्ये डावखुरा खेळाडू हवा होता. इंग्लंडचे काही फिरकीपटू आहेत जे डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करतील. डावखुरा फलंदाज मैदानात असायला हवा, अशी आमची इच्छा होती”, असं रोहितने म्हटलं.
अक्षरच्या कामगिरीत गेल्या वर्षभरात क्रिकेटर म्हणून सुधारणा झाली आहे, हे आज आम्हाला पुन्हा पाहायला मिळालं. आम्ही त्यावेळेस दबावात होतो, आम्हाला भागीदारीची गरज होती. अपेक्षेप्रमाणे शुबमन गिल आणि अक्षर पटेल या दोघांनी चांगली बॅटिंग केली”, असं म्हणत रोहितने अक्षरचं कौतुक केलं.
रोहितच्या नेतृत्वात 4 महिन्यांनी विजय
दरम्यान टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वात 4 महिन्यांनी कोणत्याही फॉर्मेटमधील पहिलावहिला विजय मिळवला आहे. रोहितच्या नेतृत्वात भारताने मायदेशात ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशवर कानपूर कसोटीत विजय मिळवला होता. भारताला त्यानंतर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 0-3 फरकाने पराभूत व्हावं लागलं. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाला रोहितच्या नेतृत्वात विजयी होता आलं नव्हतं.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.