परभणी/दैठणा (Parbhani) :- दुचाकीवरून जात असलेल्या ऊस तोड मजुरांचा टिप्पर सोबत अपघात (Accident) झाला. टिप्परच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू (Death) झाला तर इतर दोघेजण जखमी झाले. ही घटना परभणी – गंगाखेड महामार्गावर ताडपांगरी शिवारात टोलनाक्याजवळ गुरूवार ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
परभणी तालुक्यातील ताडपांगरी शिवारातील घटना
या अपघाताविषयी पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, टिप्पर क्रमांक एम.एच.१२, एफ.सी.८२७४ आणि दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत पाथरी तालुक्यातील केदार वस्ती येथील मुक्ताबाई राख वय – ४० वर्ष यांचा मृत्यू झाला. तर शिवाजी अभिमान राख वय – ४५ वर्ष, शुभम राख हे जखमी झाले आहे. सदरचे ऊस तोड कामगार मजुर सिंगणापूरकडे कारखान्यावर जात असतांना अपघात घडला. घटनेची माहिती समजताच दैठणा पोलीस ठाण्याचे सपोनि.अशोक जायभाय, पोलीस अंमलदार विठ्ठल कुंडगिर, फड, मारोती कातकडे, अशोक रसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. बाबा शेख यांनी रूग्णवाहिकेच्या सहाय्याने मयत आणि जखमींना रूग्णालयात आणले. सदर अपघाताविषयी रात्री उशिरापर्यंत दैठणा पोलीसात नोंद झाली नव्हती.