हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले तर या तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान, दान, पितरांचे श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या उपायांनी पितृदोषापासून मुक्तता मिळते.आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. पितृदोष असे आहे जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे माघ पौर्णिमेला विशेष उपाय केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते.
माघ पौर्णिमेचे महत्त्व
हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने शुभ फळ मिळतं. यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोकं पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी पोहोचतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू हे गंगेच्या पाण्यात निवास करतात, ज्यामुळे गंगा स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. गंगेत स्नान करणे शक्य नसल्यास घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळावे. या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.
पितृदोषापासून मुक्त होण्याचे उपाय
जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला कामात इतर ठिकाणी सतत अडथळे येत असतील, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा कुटुंबात अशांतता असेल तर त्याचे कारण पितृदोष असू शकते. असे असल्यास तुम्ही माघ पौर्णिमेला काही सोपे उपाय करा. हे तुम्हाला पितृदोषापासून दूर करण्यास मदत करतात.
हे सुद्धा वाचा
1. गंगा स्नान आणि तर्पण विधी
तुम्हाला जर पितृदोष असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत, विशेषत: गंगेत स्नान करावे. शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून घरीच आंघोळ करावी. त्यानंतर पितरांसाठी तर्पण विधी करावे आणि पाण्यात तीळ अर्पण करावे.
2. सूर्याला जल अर्पण करा
सकाळी सूर्याला जल अर्पण करून ‘ॐ पिताभ्यः नमः’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख-शांती टिकून राहते.
3. दिवा लावा आणि पाठ करा
माघ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चौमुखी दीप प्रज्वलित करून पितृस्तोत्र, पितृकवच किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण करावे. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
4. भोजन अर्पण करा
माघ पौर्णिमेला तुमच्या पूर्वजांचे आवडते जेवण तयार करून ते व्यवस्थित अर्पण करावे. गाय, कुत्रा आणि कावळा यांना जेवणातील काही भाग खाऊ घाला, ज्यामुळे पितरांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात.
5. चंद्राला जल अर्पण करा
रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला कच्चे दूध आणि पाण्यात पांढरे फुल ठेऊन ते पाणी अर्पण करा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि पितृदोष दूर होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)