‘पारनेर’च्या विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर; महाविद्यालय प्रशासन निष्क्रियPudhari
Published on
:
07 Feb 2025, 10:22 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:22 am
पारनेर: येथील न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये गेल्या आठवड्यात एका बारावीतील विद्यार्थ्यांने त्याच वर्गातील विद्यार्थ्यांवर केलेल्या जीव घेण्या हल्ल्यातून अद्याप महाविद्यालय सावरले नाही. पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असताना प्रशासकीय बदलीचे कारण देत प्राचार्य लक्ष्मणराव मतकर यांची तडकाफडकी बदली झाली. त्यामुळे सर्व पूर्वपदावर येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. आता विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
नगर जिल्हा मराठा या संस्थेच्या पारनेर महाविद्यालयाला वेगळी परंपरा असताना गेल्या काही दिवसांपासून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद होत आहेत. तसेच प्राध्यापकमध्येही गटतट दिसून येत आहेत. त्याचाच फायदा विद्यार्थी उचलत असून, प्राध्यापकांचा धाक विद्यार्थ्यांवर राहिला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
त्यातच प्राचार्यांचे आपल्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर कोणताही वचक व नियंत्रण नव्हते, या घटनेतून दिसून येते. त्यांची उचलबांगडी करून संस्थेने दाखवून दिले. मात्र, या सर्व घडामोडींमुळे महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच पालकबी भयभित असून, आपली मुले- मुली महाविद्यालयात पाठविण्याबाबत साशंक आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्या संदर्भात संस्था व महाविद्यालय काय निर्णय घेते, यावरच भविष्यातील महाविद्यालयाची दिशा, दशा ठरणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न!
पारनेर महाविद्यालयाबाबत अनेक वर्षांपासून पालकांमध्ये असलेली विश्वासार्हता गेल्या काही दिवसांपासून डळमळीत झाली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्यामुळे सर्वच पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आपले पाल्य महाविद्यालयात सुरक्षित नसल्याबद्दल पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची हमी देणार का?
पारनेर महाविद्यालयामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्याच्या विविध भागांतून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर महाविद्यालय हे पालक व विद्यार्थ्यांच्या विश्वासाहर्तला पात्र ठरले. मात्र गेल्या काही दिवसापासून प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांची ‘नाजूक’ प्रकरणे, तसेच विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापकांतीमधील गटतट चव्हाट्यावर आले आहेत.