अभिनेता सलमान खान याला मारण्याच्या उद्देशानं त्याच्या पनवेलस्थित फार्महाऊसची रेकी करणाऱ्या दोन आरोपींना आज जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून या आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वास्पी महमूद खान उर्फ वसीम चिकना आणि गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई असं या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.जून २०२४ मधील हे प्रकरण आहे. सलमान खानला मारण्याच्या उद्देशानं त्याच्या घराची रेकी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. मात्र त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं म्हणत न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.
आज या प्रकरणात न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायालयानं असं म्हटलं की, संदीप बिश्नोई आणि वसीम चिकना हे सलमान खानच्या हत्येची कथीत चर्चा सुरू असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होते. मात्र या दोघांचाही हल्ल्याशी थेट संबंध नाही, तसेच त्यांच्याबाबत कोणताही ठोस पुरावा सापडत नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर केला.
नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती, त्यानंतर दहा दिवसांनी 24 एप्रिल रोजी नवी मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या गाडीवर हल्ल्याचा कट रचणाऱ्या चार जणांना अटक केली. हे सर्वजण लॅरेन्स बिश्नोईच्या टोळीतील असल्याचा संशय आहे. ज्यांना अटक करण्यात आलं त्यामध्ये या दोन आरोपींचा देखील समावेश होता. हे सर्व आरोपी एका व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य होते, ज्या ग्रुपवर कथीतरित्या सलमान खानवर हल्ल्याचा प्लॅन रचण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी दीड महिन्यांपासून सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसची रेकी करत होते, त्यासाठी त्यांनी तिथे एक रूम देखील भाड्यानं घेतली होती. सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र या दोन आरोपींविरोधात न्यायालयाला कोणताही ठोस पुरावा न सापडल्यानं त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.