मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे, आता त्यांना या योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ मिळणार नाहीये. या मुद्द्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता असून, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आता येताना बातमी वाचली पाच लाख महिलांना अपात्र केलं, मत मिळाली आता अपात्र. या महिलांनी जाऊन तीन-तीन भावांना विचारलं पाहिजे आम्ही का अपात्र? तेव्हा भाऊ गर्दी झाली होती. जॅकेट भाऊ हा भाऊ, तो भाऊ. दीड दीड हजार रुपये देऊन मत दिली, हार जीत होत असते. जीत तर आपली आहे हीच खरी शिवसेना आहे. जे आहेत त्यांची इतिहासात गद्दार म्हणूनच ओळख राहील, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तीला भिकेचे डोहाळे लावायचं काम हे करत आहेत. कोस्टल रोड केलेला आहे, ना मोदींनी पैसा टाकलाय, ना फडणवीसांनी पैसा टाकलाय. हा आपला पैसा होता. त्यावेळेला इंग्रजांना मुंबई आदंन दिली होती आता अदानींना दिलेली आहे. आज माझ्या हातात काहीच देण्यासारख नसेल पण शिवसेनाप्रमुख म्हणायचे तेच सांगतोय नोकरी मागणारे होऊ नका तर नोकरी देणारे व्हा. हे जे आहेत त्यांच अस्तिव जास्त दिवस नाही हे लक्षात ठेवा, जोपर्यंत दिल्लीतून टॉर्च मारला जातोय तोपर्यंतच ते आहेत, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पुण्यात GBS आजाराने थैमान घातलं आहे. यावर विचारायचं कोणाला कारण महानगर पालिका अस्तित्वात नाही. पुणे जे भाजपकडे होत आता का उत्तर देत नाहीत. नगरविकास खात त्यांच्याकडे आहे मग ते का उत्तर देत नाहीत? अजून किती आजार वाढवायचा आहे. की फक्त काही मिळाल नाहीतर गावात जातोस आणि रेडा कापतोस. रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू, असं म्हणत त्यांनी यावेळी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे.