Published on
:
07 Feb 2025, 6:01 pm
Updated on
:
07 Feb 2025, 6:01 pm
नागपूर : महाराष्ट्रात मोठया प्रमाणात गुंतवणूक व्हावी. रोजगाराच्या संधी तसेच राज्याच्या विविध भागात उद्योग सुरु व्हावेत, यासाठी राज्य मॅग्नेटीक महाराष्ट्र-2018 चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये नागपूर विभागात 138 सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी 55 उद्योगांमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली आहे. इतर उद्योग उभारणीच्या विविध टप्यात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उद्योग विकासाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळेच सामंजस्य करारानंतर प्रत्यक्ष उद्योग सुरु करण्याला प्रतिसाद मिळत आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र शिखर परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिताभ कांत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत अक्षय उर्जा क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणुकीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आले.
नागपूर विभागामध्ये झालेल्या 138 सामंजस्य करारापैकी 55 उद्योगामध्ये उत्पादनाला सुरुवात झाली असून 19 उद्योगांचे बांधकाम सुरु आहे. 49 उद्योजकांनी प्राथमिक टप्पे पूर्ण केले आहेत. केवळ सामंजस्य करारापैकी एका उद्योगाकडून प्रतिसाद मिळाला नाही. सामंजस्य करारापैकी बहुतांश उद्योगांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. एकूण सामंजस्य करार झालेल्या 138 उद्योगांमध्ये सुमारे 2 हजार 909 रोजगार निर्मिती होणार आहे. सामंजस्य करारानुसार 55 उद्योगांमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. या उद्योगांमध्ये 1 हजार 82 रोजगार उपलब्ध झाला आहे. सामंजस्य करारानुसार नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यात 74 सामंजस्य करार झाले असून 1 हजार 23 रोजगार निर्मिती होणार आहे. यापैकी 10 उद्योगांमध्ये उत्पादन सुरु झाले. 13 उद्योगाचे बांधकाम सुरु असून 38 उद्योगांनी प्राथमिक टप्पे पूर्ण केले आहेत.13 उद्योग प्रगतीच्या टप्प्यात आहेत.
वर्धा जिल्ह्यात 26 पैकी 19 उद्योगात उत्पादनाला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यात 14 पैकी 8 उद्योग उत्पादनात आहे. गडचिरोली जिल्ह्यात 10 पैकी 6, भंडारा जिल्ह्यात 5 पैकी 4 तर गोंदिया जिल्ह्यात 9 पैकी 8 उद्योग उत्पादनात आहेत.मेक इन इंडियाअंतर्गत 274 करारापैकी 119 उद्योगांमध्ये उत्पादन मेक इन इंडिया अंतर्गत फेब्रुवारी 2016 मध्ये गुंतवणूकदराची परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेअंतर्गत नागपूर विभागासाठी 274 सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी 119 करारानुसार प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. 14 उद्योगांचे बांधकाम सुरु असून 57 उद्योगांनी प्राथमिक टप्पे पूर्ण केले आहेत. केवळ 5 उद्योगानी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.