क्रिकेट सामन्यांच्या वृत्तांकनाला खर्या अर्थाने ग्लॅमरस करणारे, आपल्या शैलीदार लेखनाने भल्याभल्या क्रिकेटपटूंची विकेट काढणारे आणि आपलं अवघं आयुष्य शिवाजी पार्कच्या सान्निध्यात व्यतित करणारे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरींवर शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी क्रिकेट जगतातील आजी-माजी क्रिकेटपटू, क्रिकेट संघटक, क्रीडा पत्रकार तसेच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या लेखसम्राट आणि लाडक्या पप्पूला निरोप दिला. क्रीडा पत्रकारितेतला एक खराखुरा चॅम्पियन आणि शब्दांचा किमयागार हरपल्याची भावना यावेळी प्रत्येकाच्या चेहर्यावर उमटली होती.
गेली चार वर्षे कॅन्सरशी झुंजत असलेल्या संझगिरींची पृथ्वीतलावरची खेळी काल संपली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियावर त्यांच्याप्रती भावना व्यक्त करत हजारो मान्यवरांनी, चाहत्यांनी, हितचिंतकांनी श्रद्धांजली वाहिली होती. आज त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत पोहोचले होते. माजी कसोटीपटू प्रवीण अमरे, समीर दिघे, अमोल मुझूमदार, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप, आमदार मिलिंद नार्वेकर तसेच ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले उपस्थित होते. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्यासह पत्रकार क्षेत्रातील अनेक दिग्गज, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी लेखसम्राटाला शोकाकुल वातावरणात मानवंदना दिली.