यवतमाळ : कळंब तालुक्यातील दुर्ग येथील शेतशिवारात चालू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच चाकूने भोसकल्याची घटना बुधवारी (ता.५) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सालगडी ज्ञानेश्वर आनंदा मोहदे (वय ५२, रा. पारवेकरनगर, कोलाम पोड), यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा मुलगा सागर मोहदे याने कळंब पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. दरम्यान, रवी आमजोर याला पोलिसांनी गुरुवारी (ता.६) ताब्यात घेतले.
येथील ज्ञानेश्वर आनंद मोहदे हा दुर्ग येथील सय्यद युनूस सय्यद महमूद यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होता. बुधवारी शेतमालकाने सालगडी ज्ञानेश्वर मोहदे यांना घरी सोडले. त्यानंतर रात्री सात वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा सागर मोहदे याने डब्बा घेऊन वडिलाला दुर्ग शेतशिवारात नेऊन सोडले. त्यावेळी लगतच्या अन्सार अहमद शेख मुनीर यांच्या शेतातील सालगडी रवी गजानन आमजोर (वय२३) हा त्याची पत्नी आणि आई-वडिलांसोबत भांडण करीत होता. तेव्हा ज्ञानेश्वर मोहदे यांनी रवीची समजूत काढून भांडण करू नये, असे सांगितले. दरम्यान, रवी याने राग मनात धरून ज्ञानेश्वर याला चाकू भोसकला. याची माहिती शेतमालकाने मृताचा मुलगा सागर याला मोबाईलवरून दिली.
त्यानंतर सागर आणि शेतमालकाने जखमीला लगेच कळंब ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सागर मोहदे यांनी कळंब पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रवी आमजोर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला. आरोपी रवी याला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.