विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ कार्यअहवालाचे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मिंध्यांना झोडून काढले. महाकुंभात बुलेटप्रुफ जॅकेट घालून गंगास्नान करणारा पंतप्रधान आपण पाहिला, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, ‘शिवबंधन’ कार्यअहवालाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. हातावर शिवबंधन आहे आणि मूठ आवळलेली आहे. ते मनगट स्वतः अंबादास दानवे यांचे आहे. काही लोकांना भाड्याने मनगटे घ्यावी लागत आहेत. ते भाड्याच्या मनगटावर शिवबंधन बांधून दाखवतात, असे सध्या महाराष्ट्रत सुरू आहे. देशात सध्या प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे. त्यासाठी अनेकजण जात आहे. पंतप्रधान मोदीही तेथे गेले. त्यांनी तेथे बुलेटप्रुफ जाकेट घालत गंगेत स्नान केले आणि जनतेला हिंदुत्वाचे विचार दिले. आज हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासेहब ठाकरे असते आणि त्यांच्या हातात कुंचला असता तर या विषयावर एक जबरदस्त व्यंगचित्र आपल्याला दिसले असते, असा टोलाही त्यांनी हाणला.
आपण आज दिल्लीत होतो. सकाळी टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. आमच्या 9 पैकी 7 खासदार फुटणार. मात्र, अरविंद सावंत यांनी सर्व खासदारांना घरी बोलावले. सर्व खासदारांनी आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. आमचा हातात पवित्र शिवबंधन आहे. आम्ही गंगेत स्नान केले म्हणून हिंदू आहोत, असे नाही. आमच्या हातात पवित्र शिवबंधन आहे. ते गंगास्नापेक्षा पवित्र आहे. त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाही, असे त्यांनी कॅमेऱ्यासमोर स्पष्ट केले. अशा या पवित्र असलेल्या शिवबंधन या नावानेच अंबादास दानवे यांचा कार्यअहवाल आला आहे. त्यांचे कार्यच बोलते. त्यामुळे त्यांना भाषण करण्याची गरज नाही.
आता आम्ही पोलादाच्या भट्टीतून तावूनसालखून बाहेर आलो आहेत. आम्हाला पक्षाने सर्वकाही दिले आहे. त्यामुळे आता मोदी आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. आम्ही तुरुंगात जाऊन आलो आहोत. पुन्हा जाऊ, आता आम्हाला पुन्हा कशाचीही भीती नाही. शिवसेनाप्रमुख हे अंगार होते. त्यांनी आमच्यात आग भरली आहे. पंतप्रधानांनी गंगास्नान केले आणि दुसऱ्याच दिवशी संसदेत खोटे भाषण केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, बलराज सहानी यांना तुरुंगात टाकले होते. त्याकाळी बलराज साहनी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांची वेगळी विचारसरणी होती. एका चित्रपटात त्यांची जेलरची भूमिका होती. त्यासाठी तुरुंगात जाऊन जेलरचे वागणे पाहता यावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यातच एका प्रकरणी ते तुरुंगात गेले आणि त्यांनी त्यांचा मुक्काम वाढवून मागितला. त्याकाळी पंतप्रधान असलेल्या पंडित नेहरुनी त्यांना तुरुंगातून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जाण्याची परवानगी दिली होती. आपल्या पंतप्रधानांना इतिहासाचे वावडे आहे, असे दिसते, असेही संजय राऊत म्हणाले.
मोदी यांनी सांगितले की, सागरा प्राण तळमळला या गाण्यावर बंदी होती, असे सांगितले. या गीतामुळे पंडित हृदयनाथ यांची नेकरी गेली असेही त्यांनी सांगितले. मात्र, आकाशवाणीनेच हे गाणी लोकप्रिय केली हे मोदी विसरतात. जे दिल्लीत सुरू आहे, तेच महाराष्ट्रात सुरू आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा खोट्यांना, गद्दारांना आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्यांना माफ करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
महाराष्ट्रात महाघोटाळा करत भाजप सत्तेवर आले आहे, हे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. फक्त पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले आणि त्या सर्वांची मतं भाजपलाच मिळाली, हाच मोठा महाघोटाळा आहे. याबाबत आम्ही दिल्लीत स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. ते कपटकारस्थान करत सत्तेवर आले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याविरोधात आपण उभे ठाकलो आहे. आम्ही डरपोक नाही, आम्ही त्यांचा निर्भयतेने मुकाबला करत आहोत.
शिवबंधन पवित्र असून हीच आपली व्रजमूठ आहे. मात्र, काहीजणांचे पाऊल गद्दारीकडे वळत आहे. शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राला स्वाभिमान आणि ताठ कणा दिला आहे. मात्र, त्यांच्या पाठीला कणा नसून रेड्याची शिंगे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. अंबादास दानवे यांच्याकडे लाल दिवा आहे. त्यांच्याकडे शिवसैनिकांचा लाल दिवा आहे. त्यांचे काम पुढील काळातही असेच राहिल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.