नागपूर : जनतेचा कौल मान्य न करता रडत बसण्यापेक्षा हिम्मत असेल तर काँग्रेसच्या खासदार, आमदारांनी राजीनामे द्यावे, बॅलेट पेपरवर निवडून येऊन दाखवावे अन्यथा ईव्हीएमवर, निवडणूक प्रक्रियेवर उगाच संशय घेऊ नये असा पलटवार मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर केला आहे. नागपुरात माध्यमांशी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत मालेगावमध्ये विशिष्ट समाजाच्या भरवशावर खासदार निवडून आला म्हणून आम्ही आक्षेप घेतला नाही. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपलेच सरकार येईल असे वाटत होते. मात्र जनतेने त्यांचा भ्रमनिरास केला. ईव्हीएम, निवडणूक आयोगावर दोषारोपण करण्यापेक्षा काँग्रेसने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. बॅलेटवर निवडणुका झाल्यास कोण आजी आणि कोण माजी होतो ते कळेलच असे आव्हानही त्यांनी दिले. विशेष म्हणजे काँग्रेसने सातत्याने विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम, वाढलेल्या मतदारांवरून महायुती सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. अलीकडेच पक्षातर्फे नेत्यांची एक ईगल समिती गठीत करण्यात आली असून शंभरावर उमेदवारांनी न्यायालयात देखील धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी आज काँग्रेसला आव्हान दिले.