नागपूर : नागपूर शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील तीन पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारे परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मृत पक्ष्यांच्या संपर्कातील ३०५४ पक्ष्यांवर ‘कलिंग’ प्रक्रिया राबविण्यात आली. याशिवाय १८० अंडी आणि १००० किलो खाद्य नष्ट करण्यात आले.
बर्ड फ्ल्यू हा आजार भारतात आजपर्यंत कोणत्याही मनुष्यामध्ये आढळून आलेला नाही. मात्र जागतिक स्तरावर तुरळक प्रकरणांची नोंद झाली या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. मृत पक्ष्यांच्या थेट संपर्कात असलेल्या कुटुंबातील सदस्यांची मनपाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व व्यक्तींचे आरोग्य उत्तम आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाद्वारे प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.