ऊसतोड मजूरांकडून जबरदस्तीने काम करून घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.Pudhari
Published on
:
07 Feb 2025, 3:38 pm
Updated on
:
07 Feb 2025, 3:38 pm
वाशी : तालुक्यातील मौजे पिंपळगाव (कोठावळा ) येथील रमाकांत लाड यांच्या शेतात उसतोड मजुरांकडून जबरदस्तीने काम करून घेतल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.७) उघडकीस आला. ३४ मजूरांना सुट्टी न देता धमकावत त्यांच्याकडून काम अधिकचे काम करून घेतले जात होते. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अनिल जाधव व माखन (गाव - बिजपुरी, सागर, मध्यप्रदेश) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमाकांत लाड यांच्या शेतात उसतोड मजुरांना धमकी देऊन त्यांच्याकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती कामगार अधिकारी सुधाकर गुणवंतराव कोनाळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वाशी येथील तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी व जनसाहस फाउंडेशनचे प्रतिनिधी यांच्यासह त्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी शेतात उत्तरप्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यातील पिसनारी गावचे ११ पुरुष, ८ महिला व १५ बालके असे एकूण ३४ जण उसतोडीचे काम करत असल्याचे निदर्शनास आले. या मजुरांना दररोज ४०० रुपये मजुरी व २ हजार रुपये अँडव्हान्स दिले असल्याचे सांगण्यात आले. परंतु, मजुरांनी काम करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट करत मूळ गावी जाण्याची परवानगी मागितली. मात्र ठेकेदाराने त्यांना परत जाण्याची परवानगी नाकारली. पगार न देणे, सुट्टी न देणे, व धमकावणे असे प्रकार घडल्याचे मजूरांनी सांगितले. याप्रकरणी कामगार अधिकारी सुधाकर गुणवंतराव कोनाळे (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपींविरुद्ध जबरदस्तीने काम करवून घेणे, वेतन न देणे, धमकी देणे यासारख्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरात यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक यादव करत आहेत.
या कारवाईदरम्यान पोलीस अधिकारी, महसूल विभाग, कामगार अधिकारी तसेच जनसाहस फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. समितीच्या तपासात मजुरांच्या तक्रारी खरी असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.