Published on
:
07 Feb 2025, 12:54 pm
Updated on
:
07 Feb 2025, 12:54 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी (9 फेब्रुवारी) कटक येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात अनुभवी फलंदाज विराट कोहली पुनरागमन करणार आहे. संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने याबाबत माहिती दिली. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना गिलने कोहलीच्या तंदुरुस्तीबद्दल सुरू असलेल्या शंका फेटाळून लावल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो पुनरागमन करेल असे सांगितले.
उजव्या गुडघ्याला झाली होती दुखापत
उजव्या गुडघ्याला सूज आल्यामुळे कोहली नागपूर वनडे सामन्यात खेळू शकला नव्हता. कोहलीच्या या समस्येमुळे भारतीय संघाची चिंता वाढली होती. परिणामी त्याच्या जागी श्रेयस अय्यरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता.
खरेतर, 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला दुबईला जायचे आहे. आगामी स्पर्धेच्या तयारीचा विचार करता कटक येथील वनडे सामना कोहलीसाठी खूप महत्वाचा असेल.
कोहली दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळेल
गिलने सांगितले की, ‘कोहलीची दुखापत गंभीर नाही. त्याने बुधवारी चांगला सराव केला होता पण गुरुवारी सकाळी त्याच्या गुडघ्यात सूज आली. त्यामुळे नागपूर वनडेत तो खेळू शकला नव्हता. पण तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नक्कीच मैदानात उतरेल,’ अशी माहिती दिली.