विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक जणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.Pudhari Photo
Published on
:
07 Feb 2025, 12:48 pm
Updated on
:
07 Feb 2025, 12:48 pm
शहागड, पुढारी वृत्तसेवा: शाळेच्या मधल्या सुटीत घरी जाणाऱ्या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक जणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज (दि.७) दुपारी १२.३० च्या सुमारास शहागड (ता.अंबड) येथे घडली. या प्रकरणी उनकू बाबाजी बसंतीया (वय ४०, रा.खमोगा, राज्य ओडिसा) याला शहागड पोलिसांनी अटक केली आहे. (Jalna Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, शहागड येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी राजवीर अनिल पवार (वय 12) हा वाळकेश्र्वर येथील रहिवासी आहे. आज दुपारी १२.३० दरम्यान, शाळेची सुटी झाल्यानंतर तो घरी जात होता. यावेळी खाकी गणवेश घातलेला उनकू बसंतीया याने त्याच्या हाताला धरून त्याला घेऊन जात होता. यावेळी विश्वकर्मा बँके जवळ दक्ष नागरिक उपसरपंच अरबाज तांबोळी आणि ग्रामपंचायत सदस्य यासर तांबोळी यांनी त्याची विचारपूस केले. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन तो पळून जाऊ लागला. यावेळी त्याला नागरिकांनी पकडून चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी मुलगा रडत होता. मुलाचे चुलते व आजोबाला या घटनेची माहिती होताच त्यांनी धाव घेतली. शहागड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Jalna Crime News)
यावेळी विश्वकर्मा बँक समोर नागरिकांनी गर्दी केली होती. अंबडचे अपहरण प्रकरण ताजे असताना ही घटना घडल्याने पालक वर्गात चिंतेची भर पडलेली आहे. या व्यक्तीला गोंदी पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी करण्यात येत आहे. उनकू बसंतीया हा ओडिशा राज्यातील असल्याचे सांगत आहे. त्याची भाषा समजत नाही. गोंदी पोलिसांनी ओडीसा पोलिसांशी संपर्क साधला आहे. ही व्यक्ती मतिमंद असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. याप्रकरणी अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.