'सोयाबीन खरेदीस पुन्हा महिन्याची मुदतवाढ द्या'File Photo
Published on
:
07 Feb 2025, 10:26 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:26 am
पारनेर: सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, ही आमची मागणी आहे. त्यासंदर्भात संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देऊ, त्याची दखल न घेतली गेल्यास सोमवारी (दि. 10) संसदेबाहेर आंदोलन करण्याचा इशारा खासदार नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
संसदेच्या अधिवेशनासाठी नवी दिल्लीमध्ये असलेल्या खासदार लंके यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गुरूवारी (दि. 6) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांच्या निवसासस्थानाबाहेर खासदार लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार लंके म्हणाले, सोयाबीन खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिली होती. मात्र, अद्याप अनेक शेतकर्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळालीच पाहिजे. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला जाईल.
आजही हमीभाव केंद्रांवर शेतकरी विविध वाहनांमधून सोयाबीन घेऊन येत आहेत. आठ दिवसांची मुदतवाढ देऊन काही होत नाही. किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यायला हवी. शेतकर्यांना द्यायचे असेल, तर मोकळया मनाने दिले पाहिजे. आठ दिवस मुदतवाढ दिल्यानंतर त्याची माहिती होण्यासाठी दोन दिवस जातात. मग चार-पाच दिवसांत काय होणार आहे? असा सवाल खासदार लंके यांनी केला.
कृषिमंत्र्यांचे वेधणार लक्ष
सोयाबीनची खरेदी न झाल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान होईल. व्यापार्यांना कवडीमोल भावाने सोयाबीन विकावे लागेल. त्यामुळे मंत्र्यांना पत्र देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधणार आहे. संसदेत आल्यानंतर पहिला प्रश्न दूध, कांदा, सोयाबीनचा मांडला होता. यावेळच्या अधिवेशनातही शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर मागण्या केल्या असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.
नगर-सुपामार्गे रेल्वेमार्गासाठी आग्रही
रेल्वेच्या मागणीसंदर्भात गेल्या अधिवेशनादरम्यान आपण रेल्वेमंत्र्यांना निवेदन सादर केले. त्यापूर्वीही यासाठी पत्रव्यवहार केला होता. संभाजीनगर, वाळुंज, देवगड, शिर्डी, शनि शिंगणापूर, अहिल्यानगर, सुपा-पारनेर एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी व पुणे या मार्गावर रेल्वेसेवा हवी, अशी मागणी असून, त्यासाठी आग्रही आहोत, असे खासदार लंके म्हणाले.