वाहन तोडफोड, कोयता गँग खपवून घेणार नाही; अजित पवार यांचा थेट इशारा File Photo
Published on
:
07 Feb 2025, 8:44 am
Updated on
:
07 Feb 2025, 8:44 am
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या थेट आणि रोखठोक शैलीत पोलिस प्रशासनाला खडे बोल सुनावले. अलीकडे पुणे शहरात घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना पिंपरी-चिंचवडमध्ये होऊ नयेत, यासाठी कडक उपाययोजनांची स्पष्ट सूचनाही त्यांनी या वेळी दिली.
पोलिस प्रशासनाला ठोस उपाययोजनांची सक्त ताकीद देताना अजित पवार म्हणाले, पुण्यातील घटनांमुळे लोक त्रस्त आहेत, पण पिंपरी-चिंचवडमध्ये असे प्रकार चालणार नाहीत. जर अशीच परिस्थिती राहिली, तर पोलिसांना दिलेल्या सुविधांचे काम थांबवावे लागेल. वाहन तोडफोड किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले जाणार नाही, असे सांगत त्यांनी भविष्यातील कठोर निर्णयांचा स्पष्ट इशाराही दिला. तुमच्याकडे सर्व साधने आहेत वाहनं, अत्याधुनिक शस्त्रे, अँटी-ड्रोन गन्स दिल्या आहेत. त्यामुळे अशा घटनांना कुठेही वाव देता कामा नये,
कोयता गँगविरोधात कठोर भूमिका
पुण्यात बिबवेवाडीत झालेल्या वाहन तोडफोड प्रकरणाचा दाखला देत अजित पवार यांनी गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यास पोलिसांना आदेश दिले. कोयता गँगचे मनोबल खच्ची करा. त्यांच्यावर मोक्का लावा. पकडल्यानंतर त्यांची धिंड काढा. त्यांची अशी फजिती करा की संपूर्ण शहराला कळले पाहिजे कायद्याचे महत्त्व काय असते, असे सांगताना त्यांच्या कडवट शैलीने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
फडणवीस मंचावर असताना नाराजी
गृहखाते सांभाळत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असतानाही अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत पुणे पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. तसेच, पिंपरी-चिंचवड पोलिसांनाही याबाबत सजग राहण्याचे आदेश दिले. कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांचा एकत्रित वावर असला तरी अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
चुकीला माफी नाही
अजित पवार हे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कडाडून टीका करणारे नेते म्हणून ओळखले जातात. कार्यक्रमातही त्यांची तीच शैली दिसली. कोणताही गुन्हेगार मोठ्या बापाचा असो किंवा छोट्या बापाचा, कायद्याने त्याला शिक्षा होईल, असे ठामपणे सांगून त्यांनी चुकीला माफी नाही, असा पोलिस दलाला स्पष्ट संदेश दिला.
शिट्ट्या मारणार्या कार्यकर्त्यांना दम
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सन्मान सुरू असताना काही कार्यकर्ते शिट्ट्या मारत होते, त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले. “शिट्ट्या वाजवणार्यांना पोलिसांना उचलायला लावीन. कार्यक्रम पोलिसांचा आहे, काय चाललंय? मुख्यमंत्री इथे आलेत ना! हा काय शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे का? शिस्त आहे की नाही?” अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दम भरला.