‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ - खासदार औद्योगिक महोत्सव’ चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.Pudhari Photo
Published on
:
07 Feb 2025, 11:37 am
Updated on
:
07 Feb 2025, 11:37 am
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेऊन तयार होत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.७) दिली. विदर्भाच्या मेगा इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि इन्व्हेस्टमेंट समिट ‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ - खासदार औद्योगिक महोत्सव’ चे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात हा सोहळा झाला.
महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योगपती सज्जन जिंदाल, बालसुब्रह्मण्यम प्रभाकरन, रोशनी नादर मल्होत्रा, अतुल गोयल तसेच अतुल सावे, संजय राठोड, डॉ. अशोक उईके, आकाश फुंडकर, संजय सावकारे, अॅड. आशिष जयस्वाल, पंकज भोयर आणि इंद्रनील नाईक हे मंत्री, नेते तसेच माजी सेना अध्यक्ष मनोज पांडे, इंडिगो एयरलाईन्स आर. के. सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या 'स्टील रेवोल्युशन'चा फायदा नजीकच्या सर्व जिल्ह्यांना होईल. वर्धन लिथियमच्या 42000 कोटींच्या सामंजस्य करारामुळे विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टीम तयार होत आहे. ‘कॉटन टू फॅशन’ अशी परिपूर्ण इकोसिस्टीम अमरावतीमध्ये पीएम मित्र पार्कच्या माध्यमातून तयार होत आहे.
संरक्षण विषयक उत्पादनात लागणाऱ्या कापसाच्या उपयोगितेबद्दल देखील त्यांनी संभाव्य इकोसिस्टीमबद्दल चर्चा केली. एव्हिएशनच्या क्षेत्रात नागपूर एअरपोर्टचा विकास करून इमीगरेशन आणि बॅगेज हॅण्डलिंगची सुविधा कशी आणता येईल, याबद्दल चर्चा सुरू असल्यावर भर दिला. यासोबतच बुटीबोरीमध्ये ईव्ही ऑपरेटरचा एमओयू करणार असून दहा हजार युवकांना ईव्ही ऑपरेटर्सच्या रूपाने ट्रेनिंग देऊन रोजगार देण्यात येईल, असेही सांगितले. तेलंगना आणि आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र सरकार यांनी मिळून पोर्ट जोडण्याच्या दृष्टीने दावोसमध्ये चर्चा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, एचसीएलच्या रोशनी नडार मल्होत्रा यांनी नागपूरला ‘फायनान्शिअल हब फॉर एआय’ मध्ये परिवर्तित करण्याचा मानस व्यक्त केला. लॉईड मेटलचे बालसुब्रमण्यम यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सतत सहकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
आयोजन समितीचे अध्यक्ष अजय संचेती आणि अॅडव्हांटेज विदर्भची टीम, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ.विजय कुमार शर्मा, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री आणि प्रणव शर्मा, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, रवी बोरटकर, महेंद्र क्षीरसागर, प्रशांत उगेमुगे, राजेश रोकडे, विनोद तंबी, महेश साधवानी, संजय गुप्ता, अविनाश घुशे यांची उपस्थिती होती. मानसी सोनटक्के यांनी सूत्र संचालन केले. आशिष काळे यांनी प्रास्ताविक केले. तर सचिव डॉ. विजय कुमार शर्मा यांनी आभार मानले.