पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी जि.प. च्या प्रवेशद्वाराला घागरींचे तोरण बांधून प्रशासनाचा निषेध केला.Pudhari Photo
Published on
:
07 Feb 2025, 1:33 pm
Updated on
:
07 Feb 2025, 1:33 pm
यवतमाळ : गेल्या तीन वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड देणाऱ्या संतप्त जामडोह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला रिकाम्या घागरीचे तोरण बांधून प्रशासनाचा निषेध नोंदविला. या संदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
तालुक्यातील जामडोह येथे गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावातील महिला, पुरुषांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. असे असताना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने गावात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली. लाखो रुपयांच्या योजनेमध्ये विहिरीसह इतरही बांधकाम आणि प्रत्येक घरी नळ देण्याचे नियोजन होते.
कंत्राटदाराने प्रत्यक्षात कामाला सुरवात केली. पहिल्यांदा विहिरीचे खोदकाम करण्यात आले. केवळ ७० फूट विहीर खोदकाम करण्यात आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून कंत्राटदाराने चक्क ८० लाख रुपयांचे देयके काढले. त्यानंतर योजनेचे कुठलेही काम केलेच नाही. या कामाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत उपसरपंचांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला. परंतु, प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलीच नाही. शेवटी संतापलेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी जिल्हा परिषद गाठली. यावेळी रिकाम्या घागरीचे तोरण करून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बांधले. त्यानंतर ग्रामस्थांनी नारेबाजी केली. यावेळी रंगराव आत्राम, शंकर मसराम, पंचफुला मसराम, सटवाबाई माहपुरे, माला गदई, सुंदरा अंजिरकार, कौसल आत्राम, कासाबाई आत्राम, शुभम गदई, पारबता कासार, विजय कासार यांच्यासह गावातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.