लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता, अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे. मात्र सध्या याचा मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहे. शिवसेनेत सुरू असलेलं हे इनकमिंग उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरलं आहे. आता यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शिरसाठ?
खासदार आमदार आणि अनेक पदाधिकारी आमच्या सोबत आहेत, संभाजीनगरमध्ये 11 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे, याआधी 6 माजी महापौरांनी प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटामध्ये शिल्लक राहिलेल्यांमध्ये पक्षाचा प्रमुख कोण यावरून स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकजण आदेश देत आहे. त्यामुळे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत.
ठाकरे गटाकडे कोणताही कार्यक्रम शिल्लक राहिलेला नाही, बेस राहिलेला नाही, त्यामुळे त्यांची डामाडोल अवस्था झाली आहे. प्रेस घेतली याचा अर्थच भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना प्रेस घ्यायला सांगितले. आमचं ऑपरेशन टायगर सुरू आहे. एकनाथ शिंदेंचे बोट वर झालं की सगळे खासदार आमच्याकडे येणार आहेत. खासदारांचा वापर कागदी वाघासारखा केला जात आहे, त्यामुळे ते आमच्याकडे प्रवेश करणार आहेत, असं शिरसाठ यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाठ यांच्या या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांनी आमची चिंता करू नये, आता कोणाच्या पाया पडायचं याची चिंता करावी. शरद पवार की राहुल गांधी कोणाच्या पाया पडायचं हे ठरवावं, असा टोलाही शिरसाठ यांनी यावेळी लगावला. राहुल गांधी यांनी मतदानावर काथ्याकूट करत बसण्यापेक्षा सरळ हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, तीथे न्याय मागावा असं देखील यावेळी मंत्री संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.