नागपूर(Nagpur) :- महापालिकेच्या एकूण महसूल उत्पन्नापैकी ३५ टक्के रक्कम वेतनावर खर्च करावी, असा राज्य शासनाचा नियम आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेचा हा खर्च दुप्पट म्हणजे ६५ ते ७० टक्क्यांवर गेला आहे. महापालिकेने आऊटसोर्सिंगवर भर दिल्याने आस्थापना खर्च वाढला आहे. महापालिकेत तब्बल ४७ टक्के पदे रिक्त असून आता ५३ टक्केच कर्मचारी उरले आहेत.
तब्बल ४७ टक्के पदे रिक्त असून आता ५३ टक्केच कर्मचारी उरले
शासनाने ७५२ पदभरतीला मंजुरी दिल्यानंतरही प्रशासनाने २४५ पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही महापालिकेची पहिली जबाबदारी आहे. महापालिकेत रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. कर्मचाऱ्यांअभावी सोईसुविधा पुरविणे कठीण जात आहे. महापालिकेचा आऊटसोर्सिंगवर विशेष भर आहे. यात कचरा संकलन, मालमत्ता कराचे सर्वेक्षण, पाणीपट्टी बिलांची देयके पाठविणे व संकलन करणे आदींचा समावेश आहे. शहरवासीयांकडून कर गोळा करून महापालिकेच्यावतीने (Municipal Corporation) सुविधा पुरविण्यात येतात. नव्या आकृतिबंधात वर्ग १ ची ३०९ पदे मंजूर असून, ८.३ अधिकारी कार्यरत आहेत. २२६ पदे रिक्त आहेत. ४ अधिकारी अलीकडेच निवृत्त झाले आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ७३.१४ आहे. वर्ग २ ची २२९ पदे मंजूर असून, ३५ कार्यरत आहेत. तब्बल १९४ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तांची संख्या १० आहे.
रिक्त पदाची टक्केवारी ८४.७२ टक्के आहे. वर्ग ३ ची ६५३४ पदे मंजूर असून, १८७९ कार्यरत आहेत. ४६५५ पदे रिक्त आहेत. २०९ सेवानिवृत्त झाले. रिक्त पदांचे प्रमाण ७१. २४ टक्के आहे. चतुर्थ श्रेणीची २२४९ पदे मंजूर आहेत. ६१९ कार्यरत असून, १६२० पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तांची संख्या ७६ आहे. हे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. महापालिकेत एकूण ९२२१ पदे मंजूर असून, कार्यरत २६१६ आहेत. रिक्त पदांची संख्या ६७०५ एवढी आहे. वर्षभरात १९९ कर्मचारी अधिकारी निवृत्त झाले. रिक्तपदांची टक्केवारी ४६.७५ टक्के आहे.