आरबीआयने जीडीपी वाढीचा दर आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सुमारे ६.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.(file photo)
Published on
:
07 Feb 2025, 5:54 am
Updated on
:
07 Feb 2025, 5:54 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सनी कमी करण्याचा निर्णय एकमताने घेतला. यामुळे रेपो रेट आता ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला असल्याची घोषणा आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, आरबीआयच्या पतधोरण समितीने जीडीपी वाढीचा दर आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सुमारे ६.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मागील डिसेंबरमध्ये झालेल्या मागील पतधोरण बैठकीत आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ६.६ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
आता १ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.७ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.५ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.५ टक्के राहण्याचा अंदाज गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे.
डिसेंबर २०२४ च्या पतधोरण बैठकीत आर्थिक वर्ष २०२५ मधील तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा अंदाज ७.४ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर, चौथ्या तिमाहीत ७.४ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांवर आणि आणि २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ७.३ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता.
जागतिक प्रतिकूल परिस्थितीचा देशांतर्गंत दृष्टिकोनावर परिणाम
जागतिक प्रतिकूल परिस्थिती भविष्यातील दृष्टिकोनावर परिणाम करत असून यामुळे जोखीम निर्माण होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आणि लवचिक आहे. पण ती जागतिक अनिश्चिततेपासून ती दूर राहिलेली नाही, असेही गर्व्हनर यांनी नमूद केले आहे.
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये किरकोळ महागाई दर ४.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर आर्थिक वर्ष २०२६ मध्ये किरकोळ महागाई ४.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महागाई कमी झाली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ती आणखी कमी होण्याची अपेक्षाही आरबीआयने व्यक्त केली आहे.