संजू सॅमसन आणि एन. तिलक वर्मा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 1 बाद 283 अशी धावसंख्या उभारली.Pudhari Photo
Published on
:
15 Nov 2024, 7:58 pm
Updated on
:
15 Nov 2024, 7:58 pm
जोहान्सबर्ग : भारतीय युवा संघाने (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेत जाऊन चमत्कार घडवला. त्यांनी चार टी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाला 3-1 ने हरवून मालिका जिंकली. शुक्रवारी झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 135 धावांनी हरवले.
संजू सॅमसन (109*) आणि एन. तिलक वर्मा (120*) यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 1 बाद 283 अशी भरभक्कम धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करणारा दक्षिण आफ्रिका नावाप्रमाणे चोकर्स ठरले. त्यांना 148 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या अर्शदीपसिंगने 20 धावांत 3 विकेटस् घेतल्या. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. दुसर्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मालिकेत बरोबरी केली; परंतु तिसरा आणि चौथा सामना जिंकून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिकेवर कब्जा केला.
भारताने दिलेल्या 284 धावांच्या डोंगराएवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात वाईटाहून वाईट झाली. रिझा हेन्रिक्स (0), रेयान रिक्लेटोन (1), एडन मार्कराम (8) आणि हेन्रिक क्लासेन (0) हे मातब्बर फलंदाज अवघ्या 10 धावांत तंबूत परत जाऊन वारा खात बसले. या चारपैकी 3 विकेटस् अर्शदीपने घेतल्या. रिक्लेटोनची विकेट हार्दिक पंड्याला मिळाली. या पडझडीनंतर त्रिस्टन स्टब्ज आणि डेव्हिड मिलर यांनी आडवे-तिडवे फटके मारून धावसंख्या वाढवली. दोघांनी 54 चेंडूंत 86 धावा जोडल्या; परंतु हे दोघे पाठोपाठ बाद झाले. वरुण चक्रवर्तीने मिलरला (36) तर रवी बिष्णोईने स्टब्जला (43) धावांवर बाद केले. त्यामुळे यजमान संघाचा डाव पुन्हा अडखळला. मार्को जान्सेन (नाबाद 29) आणि जेरार्ड कोएत्झी (12) यांचे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. शेवटी दक्षिण आफ्रिकेचा डाव 18.2 षटकांत 148 धावांवर थांबला. (IND vs SA)
तत्पूर्वी, जोहान्सबर्गमधील द वाँडरर्स स्टेडियम संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दणाणून सोडले. या दोघांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात शतके ठोकताना भारताकडून दुसर्या क्रमांकाची सर्वोच्च टी-20 धावसंख्या तर परदेशातील सर्वोच्च टी-20 धावसंख्या नोंदवली. त्यांच्या आक्रमणामुळे भारताने या सामन्यात तब्बल विक्रमी 23 षटकार आणि 17 चौकार ठोकले. या सामन्यात भारताने 20 षटकांत 1 बाद 283 धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर तब्बल 284 धावांचे लक्ष्य असणार आहे.
या सामन्यात भारताने (IND vs SA) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक खेळ केला. त्यांच्यात 73 धावांची भागीदारी झाली. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालेला अभिषेक 18 चेंडूंत 36 धावांवर बाद झाला. त्यानेही 2 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यानंतर मात्र संजू सॅमसन आणि तिलक वर्माचे वादळ आले. या दोघांनी एकाही दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाला स्थिरावू दिले नाही. सॅमसनने 28 चेंडूंत, तर तिलकने 22 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही त्यांनी आक्रमक खेळ सुरू ठेवला. त्यांनी 200 धावांची भागीदारी केली. अखेरीस 20 षटकांनंतर संजू सॅमसन 56 चेंडूंत 6 चौकार आणि 9 षटकारांसह 109 धावांवर नाबाद राहिला. तसेच तिलक 47 चेंडूंत 9 चौकार आणि 10 षटकारांसह 120 धावांवर नाबाद राहिला. भारताने नोंदवलेली 283 ही वाँडरर्स मैदानावर नोंदवलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी श्रीलंकेने येथे केनियाविरुद्ध 260 धावा केल्या होत्या.