>> दुर्गेश आखाडे
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून प्रचाराचा शेवटचा आठवडा बाकी राहिला आहे.रत्नागिरी जिह्यात महाविकास आघाडीने प्रचारात बाजी मारली आहे. जिह्यात भाजपला एकही जागा न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका मिंधे गटाला बसला आहे. रत्नागिरी जिह्यातील पाचही जागांवर महाविकास आघाडी विजयी होणार हे निश्चित मानले जात आहे.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मिंधे गटाला रत्नागिरी जिह्यात दणका बसला होता. जिह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीने मताधिक्य घेतले होते.
दापोली मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय कदम महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरले आहेत. संजय कदम यांनी जोरदार प्रचार मोहीम राबवली आहे. लोकसभा निवडणुकीत दापोलीत महाविकास आघाडीला नऊ हजारांचे मताधिक्य होते.
गुहागर मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव महाविकास आघाडीकडून रणांगणात आहेत. भास्कर जाधव यांच्या समोर उमेदवार मिळत नसल्याने मिंधे गटाला दुसऱया पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. मिंधे गटाने राजेश बेंडल यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघात महाविकास आघाडीला तब्बल 28 हजारांचे मताधिक्य होते. भास्कर जाधव गुहागरातून विजयी चौकार मारतील, असे चित्र आहे.
चिपळूण मतदारसंघात शेखर निकम यांना शरद पवार यांच्यासोबत केलेली गद्दारी भोवणार आहे. शेखर निकम अजित पवार गटासोबत गेल्याने मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चिपळूण मतदारसंघात प्रशांत यादव यांच्यासारखा तगडा उमेदवार दिला आहे. वर्षभर अगोदरच प्रशांत यादव यांनी चिपळूण आणि संगमेश्वर या दोन्ही तालुक्यांत जनसंपर्क वाढवून कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे.चिपळूण मतदारसंघात महाविकास आघाडी जोमाने काम करत आहे हे सर्वात मोठे बलस्थान आहे. लोकसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघात महाविकास आघाडीला 19 हजारांचे मताधिक्य होते.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही गद्दाराला धडा शिकवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. रत्नागिरीतून सलग चार वेळा निवडून आलेल्या मिंधे गटाच्या उदय सामंत यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे.गेल्या वीस वर्षांत रत्नागिरीचा विकास खुंटला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून नागरिकांना आता बदल हवा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ माने महाविकास आघाडीकडून रिंगणात उभे आहेत. त्यांनी उदय सामंत यांना कडवे आव्हान दिले आहे. उद्योगमंत्री असतानाही उदय सामंत जिह्यात एकही उद्योग आणून शकले नाहीत त्यामुळे रोजगारापासून तरुणाई वंचित आहे. मतदारसंघातील अनेक विकासकामे रखडली आहेत. आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. या सर्व नाराजीचा फटका उदय सामंतांना बसणार आहे. त्यांच्या सततच्या पक्षांतराला रत्नागिरीकर पंटाळले आहेत. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात महाविकास आघाडीला 10 हजारांचे मताधिक्य होते.
राजापूर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राबल्य आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. राजन साळवी सलग तीन वेळा राजापुरातून निवडून आले आहेत. राजापुरात पैसा विरुद्ध निष्ठा या टॅगलाईनखाली राजन साळवी निवडणूक लढवत असून त्यांना जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरापूर्वी पोलिसांची दडपशाही वापरून रिफायनरी प्रकल्प रेटणाऱया मिंधे गटाला रिफायनरी रद्द करायची भूमिका घ्यावी लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीला 21 हजारांचे मताधिक्य होते. या मताधिक्यात वाढ होऊन राजन साळवी विजयी चौकार मारतील अशी चिन्हं आहेत.