Published on
:
16 Nov 2024, 12:15 am
चिपळूण शहर : गुहागर मतदारसंघातील जनतेच्या मनात परिवर्तन करण्याची इच्छा आहे. या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा गुहागरचे महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांनी केला. आपल्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 16) सकाळी 11.30 वा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुहागर येथे महायुतीच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांची भव्य प्रचारसभा होणार आहे, अशी माहिती बेंडल यांनी दिली. ही सभा सकाळी 11.30 वा. पाटपन्हाळे हायस्कूलच्या मैदानावर शृंगारतळी येथे होणार आहे.
या प्रचारसभेला पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम, उपनेते सदानंद चव्हाण, नेते रवींद्र फाटक व अन्य महायुतीचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
गुहागर मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांतील प्रमुख पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 15) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला उमेदवार बेंडल यांच्यासह शिवसेना आ. रवींद्र फाटक, भाजपचे माजी आ. विनय नातू, चिपळूणचे माजी आमदार व शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख संदेश आयरे, शंकर कांगणे आदी पदाधिकारी होते.(Maharashtra assembly poll)
यावेळी राजेश बेंडल म्हणाले, मतदारसंघात पर्यटन, शेती, औद्योगिक व्यवसाय हे महत्त्वाचे विषय आहेत. यातून रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले प्रयत्न आहेत. मी सामान्य कुटुंबातील सर्व समाजांत कार्यकर्ता असून माझे वडील आमदार होते. ही पार्श्वभूमी असतानाही मी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच काम करीत आहे. महायुती म्हणून सर्वजण एकत्र आहोत, असे बेंडल यावेळी म्हणाले.