नरतवडे : येथे प्रचार सभेत बोलताना फत्तेसिंह भोसले-पाटील व राजेंद्र भाटळे. समोर उपस्थित जनसमुदाय.
Published on
:
16 Nov 2024, 2:41 am
Updated on
:
16 Nov 2024, 2:41 am
राधानगरी : उसाला राज्यात उच्चांकी दर देणार्या बिद्री साखर कारखान्याचे व पर्यायाने शेतकर्यांचे अर्थकारण बिघडवण्यासाठी या साखर कारखान्यावर रात्रीच्या अंधारात शासनाच्या धाडी टाकणारे आ. प्रकाश आबिटकर आता कोणत्या तोंडाने शेतकर्यांकडे मते मागत आहेत? असा सवाल बिद्रीचे संचालक फत्तेसिंह भोसले-पाटील यांनी केला.
कारखान्याला राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग करून अडचणीत आणणे हे कामगार पुत्र असलेल्या आबिटकरांना शोभते का? असा सवाल याच साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे यांनी केला. नरतवडे (ता. राधानगरी) येथे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचार सभेते दोघेही बोलत होते. भोसले-पाटील म्हणाले, बिद्रीच्या सभासदांची मते निर्णायक असतातच हे माहीत असूनही कारखाना अडचणीत आणून शेतकर्यांची बिले थकवायची आणि त्यामुळे चेअरमन असलेल्या के. पी. पाटलांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा अशी कुटिल राजनीति आबिटकर यांनी आखली होती. याच रागातून सभासदांनी त्यांचा कारखान्याच्या निवडणुकीत पराभव केला.
भाटळे म्हणाले, वडील बिद्री कारखान्यात कामगार असल्यामुळे एकेकाळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला याचा विसर पडलेले कामगारपुत्र आबिटकर यांनी सत्तेचा दुरुपयोग करीत बिद्रीच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणारे प्रकल्प अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीत मतदार विद्यमान आमदारांचा पराभव करतील.
ज्येष्ठ संचालक राजेंद्रदादा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राजाराम पाटील, सुरेश चौगले, भिकाजी एकल, शामराव देसाई, रणजीत बागल, आर. के. मोरे, वसंतराव पाटील आदींची भाषणे झाली. राहुल देसाई, दीपक नवणे, एम. एन. पाटील, टी. ए. मगदूम, अॅड. ए. एम. पाटील, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
आबिटकारांच्या संवेदना बोथट, म्हणूनच त्यांची गद्दारी
आ. आबिटकर संवेदनाहीन आहेत. ज्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्याला आमदार केले, ज्या साखर कारखान्यामुळे आपले वडील कुटुंबाचा गाडा हाकू शकले, ज्या शेतकर्यांनी मतदान देऊन विधानसभेत पाठविले अशा सर्वांशीच आबिटकरांनी वेळोवेळी गद्दारी केली आहे. त्यांच्या संवेदना बोथट झाल्याने त्यांना कसल्याही उपकाराची जाणीव नसल्याचा माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला.