Published on
:
16 Nov 2024, 4:36 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:36 am
महाड : जय भवानी, जय शिवाजीच्या जयजयकारा, ढोल, ताशांच्या निनादात शुक्रवारी सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले रायगडच्या पायथ्याशी मावळा प्रतिष्ठानच्यावतीने मशाल महोत्सव उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. एकाचवेळी शेकडो मशाली ऐतिहासिक चित्त दरवाजाच्या पायथ्याशी प्रज्वलित झाल्याने सारा आसमंत उजळून गेला होता. शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मावळा प्रतिष्ठानच्या वतीने चित्त दरवाजा जवळ मशाल महोत्सव आयोजित महाड प्रतिनिधी मावळा प्रतिष्ठान रायगडच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारी उपक्रमानुसार किल्ले रायगडच्या चित्त दरवाजा व माँसाहेब जिजामाता समाधी पाचाड येथे दीपोत्सव भव्य मशाल महोत्सवाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी शिवभक्त व मावळा प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळा प्रतिष्ठानच्या वतीने दुपारी सर्वप्रथम मासाहेब जिजामाता समाधी येथे समाधीपूजन केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता किल्ले रायगड व गडदैवता शिरकाई देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन व महाआरती तसेच दीपोत्सव व भव्य मशाल महोत्सवाचे आयोजन सायंकाळी उशिरा करण्यात आले. यावेळी गडकोट बांधणी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांकडून केले सायंकाळी उशिरा गोंधळ कार्यक्रम झाल्यानंतर रात्री आठ वाजता हा कार्यक्रम समाप्त झाला. शिवसेना युवा नेते विकास गोगावले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या महोत्सवाला भेट दिली. प्रतिवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल त्यांनी मावळा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना व शिवभक्तांना धन्यवाद देऊन आगामी काळात अधिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शिवभक्त आणि उपस्थित रहावे असे आवाहन केले.
मागील सहा वर्षांपासून मावळा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले रायगड परिसरातील छत्रपती शिवरायांच्या साक्षीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे चालू वर्षी शिवभक्तांची राहिलेली उपस्थिती लक्षात घेता पुढील वर्षात यामध्ये अधिक वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठानच्या वतीने अधिक प्रयत्न केले जातील असे यावेळी सांगण्यात आले.