Published on
:
16 Nov 2024, 6:25 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:25 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: राजधानी दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. शनिवारी (दि.१६) सकाळीही दिल्लीत प्रदूषणाची अत्यंत धोकादायक पातळी नोंदवली गेली. सकाळी ७ वाजता दिल्लीतील 10 हून अधिक स्थानकांवर हवा गुणवत्ता निर्देशांकाची (AQI) 400+ नोंद झाली. जहांगीरपुरीमध्ये AQI 445 ची सर्वोच्च पातळी गाठली. सध्या दिल्लीतील सामाईक हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 436 गंभीर स्थितीत आहे.
कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अतिशी यांनी सरकारी कार्यालयांच्या नव्या वेळा जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकारची कार्यालये सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, दिल्ली सरकारी कार्यालये सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 आणि MCD कार्यालये सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 या वेळेत काम करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
Delhi Pollution | दिल्लीमध्ये AQI 400 पार, सरकार अलर्ट मोडवरairquality.cpcb.gov
विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य
दिल्लीतील सर्व प्राथमिक (इयत्ता पाचवीपर्यंत) शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची घोषणा शुक्रवारीच करण्यात आली होती. आता दिल्लीतील सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळांना मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात दिल्ली सरकारकडून घेण्यात आला आहे.
सरकारकडून खाजगी वाहने न चालवण्याचे आवाहन
सरकारने लोकांना खाजगी वाहने न चालवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी 106 अतिरिक्त क्लस्टर बस आणि मेट्रोच्या 60 ट्रिप वाढवण्यात आल्या आहेत, जेणेकरून लोक खाजगी वाहनांचा कमी वापर करतील. एअर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने (CAQM) देखील NCR मधून येणाऱ्या बसेसला म्हणजेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून दिल्लीला येण्यास बंदी घातली आहे.