शरद पवार यांनी हडपसरच्या विकासासाठी चेतन तुपे यांना संधी दिली होती. मुंढवा-केशवनगर दोन मतदारसंघांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इकडे चेतन तुपे आणि तिकडे सुनील टिंगरे या दोन गद्दार आमदारांनी लावलेल्या दिव्यांमुळे तुमच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. या समस्या सोडवण्याची जबाबदारी महापौर म्हणून प्रभावी काम केलेल्या प्रशांत जगताप यांनी घेतली असून, त्यांना हडपसरच्या प्रतिनिधित्वाची संधी द्यायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ केशवनगरमधील झेड कॉर्नर येथे आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. या प्रसंगी प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे आदी उपस्थित होते. 20 नोव्हेंबर नंतर महिला लाडक्या बहिणी राहणार नाहीत जयंत पाटील म्हणाले, लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे - फडणवीस - पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीची कवाडे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरु केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले आहे. मात्र, हे लोक २० नोव्हेंबरपर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत. त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत. पवार, ठाकरेंशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवा हे राज्यकर्ते सल्लागारांच्या भरवशावर काम करत आहेत. मागच्या अडीच वर्षात महायुती सरकारने महागाई दिली. जीएसटीचा बोजा लादला. समस्यांचा डोंगर उभा केला. आमचे घड्याळ चोरून नेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चिन्हाखाली 'न्यायप्रविष्ट' लिहिण्याची सक्ती केली. हे जगातील पहिलेच उदाहरण असावे. ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष जन्माला घातला, त्यांना त्यापासून तोडण्याचे पाप भाजपने केले. त्यामध्ये ज्यांना आम्ही मोठे केले, तेच लोक होते. मात्र, आजही ८४ वर्षांचा हा योद्धा दिवसाला चार-पाच सभा घेतो. त्यांचा उत्साह, जिद्द आपल्याला प्रेरणा देणारी आहे. आपल्यासाठी थांबलेल्या लोकांना भेटण्यासाठी अंधार पडला, तरी हेलिकॉप्टर सोडून मोटारीने सभेला जाण्याची त्यांची इच्छाशक्ती महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारी आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले. शिंदे, पवार, फडणवीसांनी गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारले जयंत पाटील पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारून राज्य मोदी-शहांच्या दावणीला बांधले आहेत. हे लोक त्यांच्यासमोर चकार शब्दही काढत नाहीत. त्यामुळे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला असून, ११ व्या स्थानी फेकला गेला आहे. या अपयशाचे धनी फडणवीस आहेत. महाराष्ट्राला पिछाडीवर घेऊन जाण्याचे पाप यांनी केले आहे. राज्य अधोगतीकडे जात असून, कर्जबाजारी होत आहे. आजघडीला महाराष्ट्रावर नऊ लाख कोटींचे कर्ज आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)