नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघात वसंत गिते यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिला भगिनी.
Published on
:
16 Nov 2024, 6:08 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:08 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची 'मशाल' धगधगणार आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांना या मतदारसंघातून मताधिक्य देण्याचा संकल्प मतदारांनी केला आहे. खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातूनही ही बाब अधोरेखित झाली आहे. गेल्या चार दशकांपासून सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात आपल्या कार्याने अढळ स्थान निर्माण करणारे वसंत गिते हेच नाशिकला प्रगतिपथावर नेऊ शकतील, असा ठाम विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून वसंत गिते यांचे नेतृत्व बहरले. आक्रमक कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, आमदार असा त्यांच्या प्रवासाचा आलेख चढता राहिला. नाशिक महापालिकेत बिनविरोध निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी नोंदवला. महापौर म्हणून शहर विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. २००९ मध्ये नाशिक मध्य विधानसभेचे आमदार म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती. शहर विकास, कायदा व सुव्यवस्था, मूलभूत सुविधा, बेरोजगारी आदी प्रश्नांवर श्री. गिते यांनी विधीमंडळात नाशिकचा आवाज बुलंद केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिते यांची रणनीती यशस्वी ठरली. सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी नाशिकचा गड लीलया जिंकला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गिते यांच्यावर विश्वास व्यक्त केला. खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरलेले शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस तसेच घटक पक्षांच्या भक्कम साथीमुळे गिते यांनी प्रारंभापासूनच आघाडी घेतली.
नाशिककरांसाठी वचनांची पंचसूत्री देणारे ते एकमेव उमेदवार ठरले. 'भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक', तरुणाईच्या स्वप्नांना बळ, वाहतुकीची कोंडी सुटणार, गोदामाईचे संवर्धन यासारखी पंचसूत्री जाहीर करून त्यांनी विधीमंडळातील आगामी वाटचालीचे संकेत दिले. त्यामुळेच जात-पात, धर्म, राजकीय मतभेद बाजूला सारून शहरातील सर्वच घटक वसंत गिते यांच्या पाठीशी एकवटला आहे.
लोकसभेच्या पुनरावृत्तीचा ध्यास
विधानसभा निवडणुकीला प्रारंभ झाल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस तसेच घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार मोहिमेत झोकून दिले. लोकसभा निकालाची यंदा पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसैनिक रिंगणात उतरले आहेत.