Published on
:
16 Nov 2024, 4:45 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:45 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने, जाहीर सभांसह सोशल मीडियावरून एकमेकांवर टोकाचे वार केले जाण्याची शक्यता असल्याने, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सोशल मीडियावर सायबर पोलिसांकडून २४ तास गस्त घातली जात असून, आक्षेपार्ह मजकूर अथवा पोस्ट शेअर करणारे सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत.
२० नोव्हेंबर रोजी मतदान असून, १८ नोव्हेंबर राेजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उरलेल्या अवघ्या दोन दिवसांत उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न असून, विरोधी उमेदवारांच्या नकारात्मक बाबी मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने याबाबीदेखील बाहेर काढल्या जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही व्यक्तिगत विषय सोशल मीडियातून व्हायरल केले जाण्याची भीती असल्याने, यंत्रणा सतर्क आहे. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा दिला आहे. याशिवाय सायबर पोलिस सोशल मीडियावर २४ तास गस्त घालत आहेत.
गेल्या लाेकसभा निवडणुकीत काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. या व्हिडिओची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणुकीतही अशा प्रकारचे व्हिडिओ बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे. बहुधा काही व्हिडिओ व्हायरलदेखील होत आहेत. त्यामुळे सायबर पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे.