Published on
:
16 Nov 2024, 4:50 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:50 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराला जोर चढला असून २८८ मतदारसंघांत २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणात यावेळी राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह नोंदणीकृत असे एकूण १५८ राजकीय पक्ष उतरले आहेत. विशेष म्हणजे युती आणि आघाडीपेक्षा स्वबळावर लढणाऱ्या बहुजन समाज पक्षाने सर्वाधिक म्हणजे २३७ उमेदवार उभे केले आहेत. त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे २०० उमेदवार आखाड्यात आहेत. खेरीज तब्बल २ हजार ८६ अपक्ष उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
महायुतीत भाजप सर्वात जास्त म्हणजे १४८ जागा लढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ८१, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ५९ जागा लढवत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस १०१, शिवसेना उद्धव ठाकरे गट ९५ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ८६ जागांवर लढत आहे. महायुतीचा घटकपक्ष असलेला, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे ३१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २८८ पैकी १२५ मतदारसंघांत उमेदवार उभे करता आले आहेत. राष्ट्रीय पक्ष असलेला माकप केवळ तीन जागा लढवत आहे. मुस्लिम मतदारांवर प्रभाव असलेला एमआयएम पक्ष १७ जागांवर लढत देत आहे. माजी मंत्री महादेव जानकर प्रमुख असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेच्या ९३ जागा लढत आहे. राज्याच्या राजकारणातील जुन्या राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत १६ उमेदवार दिले आहेत. त्याचबरोबर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी २२, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ३२ जागा, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया - डेमोक्रॅटिक ४४, प्रहार जनशक्ती पक्ष ३८, आझाद समाज पार्टी काशीराम २८ जागा या पक्षांनीही आपले उमेदवार उभे करून रंगत आणली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात उतरलेले ५२ राजकीय पक्ष केवळ एक जागा लढवत आहेत.
यंदा चार हजार १३६ उमेदवार रिंगणात
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांची यादी आणि त्यांच्या उमेदवारांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार विधानसभेच्या २८८ जागांसाठी एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२५ राजकीय पक्ष उतरले होते. यावेळी पक्षांची संख्या वाढली आहे.