मी गुजरातचा, गुजराती लोकांचा शत्रू नाही. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास हिसकावून घेऊन, खेचून काढून जर गुजरातच्या तोंडात घालणार असाल, तर तो हात छाटल्याशिवाय राहणार नाही, असा सणसणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रद्वेष्टय़ांना दिला. मोदींच्या थापा ऐकत ऐकत नुसते आंधळेपणाने मत देऊ नका, आता आपली वेळ आली आहे, आता तुम्हाला राग आला पाहिजे, तुमची सटकली पाहिजे, अशी साद यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला घातली.
अरे मिंध्या, मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून उभा आहे. मर्दाची अवलाद असलास तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुझ्या वडिलांचा लावून मैदानात उतर. मग जनतेला ठरवू द्या.
अरे नामर्द गद्दारांनो, हा महाराष्ट्र लेच्यापेच्यांचा प्रदेश नाही, हा वाघांची पैदास करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. जनतारूपी वाघनखे उद्याच्या निवडणुकीत तुमच्या गद्दारीचा विश्वासघाताचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही.
नाशिक जिह्यात मनमाड येथे नांदगावचे उमेदवार गणेश धात्रक, मालेगाव येथे अद्वय हिरे आणि नाशिक शहरातील नाशिक पश्चिमचे सुधाकर बडगुजर, मध्यचे वसंत गीते, देवळालीचे योगेश घोलप, निफाड येथील अनिल कदम यांच्यासह जिह्यातील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. तर छत्रपती संभाजीनगर जिह्यात वैजापूर येथे दिनेश परदेशी, सिल्लोड येथे सुरेश बनकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा झाल्या. या वेळी उद्धव ठाकरे यांनी मिंधे-भाजपवर चौफेर हल्ला चढवला. पुन्हा हे कपाळकरंटं सरकार आलं आणि तुमच्या सातबाऱयावर अदानीचं नाव लागलं तर तुम्ही न्याय कोणाकडे मागणार, असा प्रश्न विचारत आयुष्यात काळोख नको असेल तर मशालीशिवाय पर्याय नाही, गद्दारांनी लावलेला कलंक पुसण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येताहेत आणि थापा मारून निघून जाताहेत. आठवतंय ना! 15 लाख रुपये देतो, वर्षाला दोन कोटी नोकऱया देतो… किती जणांना मिळाल्या नोकऱया…? आता मोदींच्या थापा ऐकत ऐकत त्यांना आंधळेपणाने मतदान करू नका, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली.
महाविकास आघाडीतील एका पक्षाने त्याचा ‘रिमोट कंट्रोल’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱयांच्या हाती दिला आहे, असे पंतप्रधान मोदी मुंबईतील सभेत बोलले. त्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. मोदीजी, शिवसेनेचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे बघायचा प्रयत्न करू नका. मी बाळासाहेबांचा सुपुत्र आहे. तुमच्या हातात शिवसेनेचा रिमोट दिला नाही तर काँग्रेसच्या हातात कसाकाय जाऊ देईन, असे सडेतोड प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले.
…तर पंतप्रधान पदावरून उतरा आणि गद्दारांच्या टोळीत सामील व्हा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी गद्दारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येतात ही शरमेची बाब आहे. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गद्दारांचे, असा सडेतोड सवाल करतानाच, गद्दारांच्या प्रचाराला येत असाल तर पंतप्रधान पदावरून उतरा आणि गद्दारांच्या टोळीत सामील व्हा, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. पक्ष, नाव, निशाणी चोरून, महाराष्ट्रातील जनतेचं समाधान, आयुष्य, भविष्य चोरून मस्तवालपणे फिरणाऱ्यांची दादागिरी दहा दिवसांत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उतरेल, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
गुजरातला एक नंबर करणार हेच त्यांचं धोरण
महाविकास आघाडीचे सरकार असताना कोरोनाच्या काळातसुद्धा साडेसहा लाख कोटींच्या उद्योगधंद्यांचा सामंजस्य करार करण्यात आला होता. हे सर्व उद्योग महाराष्ट्राच्या सर्व भागात आले असते. मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर विदर्भातला टाटा एअरबस उद्योग आपल्या डोळ्यादेखत गुजरातला नेला, अहमदाबादमध्ये त्याचं मोठं उद्घाटन केलं. महाराष्ट्रातल्या लोकांनो, तुम्ही मत द्या किंवा नका देऊ, आम्ही गुजरातला एक नंबर करणार हेच त्यांचं धोरण आहे, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.
लोकशाही मरतेय आणि चंद्रचूड प्रवचन झोडत बसलेत
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालात चालढकल केलेले माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, चंद्रचूड यांनी दोन वर्षे तारीख पे तारीख करत दिवस काढले. गद्दार थयथयाट करताहेत, पैसे खातायत, महाराष्ट्राची लयलूट होतेय ते न पाहता चंद्रचूड बाहेर नुसते कायदा कसा पाहिजे यावर भाषण झोडत होते. लोकशाही मरतेय आणि लोकशाही कशी जगवली पाहिजे याच्यावर प्रवचन झोडत होते. लोकशाही वाचवण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हाती असतानाही त्यांनी केले नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मग जनतेच्या मताला किंमत काय?
सरकार पाडण्याच्या वेळेला उद्योगपती अदानी होते, असे अजित पवार यांनी सांगितले. हा धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात सरकार कोणाचं आणायचं, कोण राज्य करणार हे उद्योगपती ठरवणार आहेत, म्हणजे जनतेच्या मताला किंमत नाही. महाराष्ट्राच्या जमिनी अदानीच्या घशात जाणार आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे होऊ देणार नाही. मुंबईतील एक हजार एकर जमीन अदानीच्या घशातून काढल्याशिवाय राहणार नाही. पण पुन्हा हे सरकार आलं आणि तुमच्या सातबाऱयावर अदानीचं नाव लागलं, तर तुम्ही कोणाकडे न्याय मागणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
नाशिकमधील सभांना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री प्रशांत हिरे, उपनेते सुनील बागूल, अद्वय हिरे, अशोक धात्रक, शुभांगी पाटील, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, माकपाचे ज्येष्ठ नेते डॉ. डी.एल. कराड, विनायक पांडे, जयंत दिंडे, दत्ता गायकवाड, बबन घोलप, जगन्नाथ धात्रक, नरेंद्र दराडे, नितीन आहेर, कुणाल दराडे, विलास शिंदे, डी.जी. सूर्यवंशी, काsंडाजी आव्हाड, नाना महाले, गजानन शेलार उपस्थित होते. सिल्लोड आणि वैजापूर येथील सभेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात मशाल पेटलेली आहे
महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात कुठेही मान वळवून बघा, मशाल पेटलेली आहे असे वैजापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिनेश परदेशी यांच्या प्रचारसभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले. वर्षा सोडून मातोश्रीवर निघालो तेव्हा हातात ग्लास घेऊन नाचत होते त्यातला एक गद्दार वैजापुरातही आहे. मिंध्यांनी या गद्दारांना पन्नास खोके नुसते तोंडी लावायला दिले, पण विकासकामांसाठी हजारो कोटी दिले गद्दारांना. त्यातले एकही काम वैजापुरात दिसत नाही, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. मोदी-शहा डोळ्यादेखत आपला महाराष्ट्र लुटून गुजरातला नेताहेत, मग काय आम्ही षंढासारखे बघत बसावे, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तुम्ही न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, पण माझा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तो कौरवांचा बाप धृतराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या हक्काचे कसे लुटताय ते सगळा महाराष्ट्र पाहतोय, याची जाणीव उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांना करून दिली. यांच्या थापा ऐकत ऐकत आता नुसते आंधळेपणाने मत देऊ नका, असे आवाहन त्यांनी वैजापूरकरांना केले.
मनसेचे अकबर सोनावाला यांचा शिवसेनेत प्रवेश
मनमाड येथे मनसेचे उमेदवार अकबर सोनावाला यांनी शिवसेना उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी शिवसेनेत प्रवेश केला.
आज बॅग तपासायलाच कुणीच आले नाही, सोयाबीनपेक्षा माझा भाव उतरला की काय?
उद्धव ठाकरे जिथे-जिथे सभेला जात आहेत तिथे हेलिकॉप्टरने उतरताच निवडणूक अधिकाऱयांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली होती. त्याचे व्हिडियोही उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आज सिल्लोड, वैजापूर येथे हेलिपॅडवर उतरताच त्यांनी चौफेर नजर टाकली. कुठे निवडणूक अधिकारी दिसताहेत का ते पाहिले. पण कुणीही त्यांची बॅग तपासायला आले नाही. त्याबाबत त्यांनी प्रचारसभेत आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, आज बॅग तपासायलाच कोण आले नाही. मला वाटले, आपले महत्त्व इतके कमी झालेय? बॅग तपासत नाहीत म्हणजे काय! माझी किंमत सोयाबीनच्या भावापेक्षा खाली गेली की काय? अशी मिश्कील टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित जनसमुदायामध्ये हास्याचे कारंजे उडाले.
…मगच धर्मावर बोला
मतांचं धर्मयुद्ध करा, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, पहिले तुझं कर्मयुद्ध दाखव, किती पैसे खाल्ले ते दाखव. पहिले कर्म काय आहे ते सांग, मग धर्मावर बोल. पाप केलं असशील तर पापी मनाने तू आमच्या पवित्र धर्माबद्दल बोलू नकोस, असे सुनावले.
सिल्लोडमधील गद्दाराला तुरुंगात टाकणार
सिल्लोड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱया मिंधे गटाच्या अब्दुल सत्तार यांची अक्षरशः सालटी सोलून काढली. अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात. कालही मुंबईत पंतप्रधान मोदींच्या सभेत खुर्च्यांची गर्दी झाली होती. पण माणसेच कुणी आली नाहीत. इकडे मात्र एकही कुणी भाडय़ाने आलेले नाही. ही गर्दी सिल्लोडमधील गुंडागर्दी जाळून टाकायला आलीय असे उद्धव ठाकरे म्हणाले. सिल्लोडमधील गद्दाराने सुप्रिया सुळेंना टीव्ही पॅमेऱयांसमोर शिवीगाळ केली होती. काल तोच माणूस छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधानांच्या व्यासपीठावर बसला होता. महिलांवर अत्याचार करणारा कर्नाटकातला प्रज्ज्वल रेवण्णाही काही महिन्यांपूर्वी मोदींच्या व्यासपीठावर होता, असे सांगताना, हीच मोदींची संस्कृती आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. सर्वसामान्य माणसे एकवटतात तेव्हा कितीही मोठा माणूस असला तरी कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही, हा या देशाचा इतिहास आहे. ही संधी सोडू नका. चला एकत्र येऊन गुंडागर्दी मोडून काढूया, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडवासियांना केले. सिल्लोडमधील गद्दाराच्या पापाच्या पाढय़ाची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला
तुरुंगात टाकून याला कांदे सोलायला लावणार
शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटाकडून नांदगावात सुहास कांदे निवडणूक लढवत आहेत. कांदे यांचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना चपराक लगावली. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी कांदे यांना शिवसेना नेते संजय राऊत यांना मत द्यायला सांगितले होते. परंतु त्याने गद्दारी केली, त्याचे मत बाद झाले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार आल्यानंतर नांदगावातील या गद्दाराला तुरुंगात टाकून कांदे सोलायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.