सातारारोड येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना आ. शशिकांत शिंदे .Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 2:25 am
Updated on
:
16 Nov 2024, 2:25 am
पळशी : लोकप्रतिनिधी संकुचित वृत्तीचे असून सत्ता, पैसा, हुकुमशाही या माध्यमातून विकासकामांच्या नावाखाली जनतेला गुलाम बनवण्याचे काम चालू आहे. सध्या ते भुमिपुत्राची भाषा करत आहेत. ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का? असा सवाल कोरेगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी केला.
सातारारोड - पाडळी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आनंदराव फाळके, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर, राजाभाऊ जगदाळे, सुरेश पाटील, छायाताई शिंदे, राजेंद्र शेलार, अर्चना देशमुख, अविनाश फाळके, राजेंद्रकाका भोसले, दिनेश बर्गे उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कोरेगावात बर्गे, सातारारोडमध्ये फाळके, कुमठ्यात जगदाळे या घराण्यांचे त्या त्या ठिकाणी वेगळे वलय आहे. परंतु सध्या कोणीतरी येतो आणि गावागावात माणसामाणसात भांडणे लावून जातो. स्वतःच्या स्वार्थासाठी येथील मतदारांवर दबाव टाकून दादागिरी केली जात आहे. या राज्यात सत्यशोधक चळवळीची सुरुवात पाडळी येथून झाली. पण याच मतदारसंघात विरोधकांकडून त्याला मुठमाती दिली जात आहे.
आ. शिंदे पुढे म्हणाले, मी जलसंपदा मंत्री असताना मेडिकल कॉलेजसाठी जागा मिळवली, खटावच्या पाण्याचे नियोजन केले ही सत्य परिस्थिती असून ती लोकांना समजली पाहिजे. डॉ. शालिनीताई पाटील यांनी दिलेला पाठिंबा मला उर्जा निर्माण करून देणारा आहे. मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. यात माझी काय चूक? कर्तृत्वावर जाऊन दोन आमदारांमधील फरक पहा. मी जमीनीवर पाय ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. काही दिवसात या मतदारसंघात पैशाचा महापूर येईल पण जनतेने त्याला भिक न घालता तत्व, निष्ठा, प्रामाणिक पणा या पाठीशी राहून येथे पैसा नाही तर माणुसकी चालते हे दाखवून द्यावे, असे आवाहनही आ. शिंदे यांनी केले.
विश्वासघात करणारे भूमिपुत्र कसले?: होळकर
बळ, बुद्धी, चातुर्याच्या जोरावर जो स्वतःचा स्वार्थ न ठेवता जनतेसाठी काम करतो तो खरा भूमिपुत्र असतो. मात्र सत्तेसाठी येथील आमदारांनी 50 खोके घेवून जनतेचा स्वाभिमान गहाण ठेवला. जो लोकप्रतिनिधी जनतेचा विश्वासघात करतो तो कसा भूमिपुत्र? अशी टीका भूषणसिंहराजे होळकर यांनी आ. महेश शिंदे यांच्यावर केली.