पुणे झाले कोयता गँगचे शहर: संजय राऊतFile Photo
Published on
:
16 Nov 2024, 4:31 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:31 am
Pune News: विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे आता कोयता गँगचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. येथे दिवसाढवळ्या खून, मारामार्या, दरोडेखोरी होत असून, या रक्तपातावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पालकमंत्री घेणार आहेत का? असा सवाल शिवसेनेचे (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे, संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर, शिवसेना नेते प्रशांत बधे , पुणे शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेविका वैशाली मराठे आदी या वेळी उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले की, छातीवर मुठी आपटून निष्ठेच्या आणाभाका घेणार्यांनी वेळ येताच पळ काढला. परंतु, मोकाटे यांनी पक्ष टिकविण्यासाठी कडा संघर्ष केला. निष्ठा म्हणजे काय हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. असा प्रामाणिक निष्ठांवत नेता उमेदवार म्हणून कोथरूडला लाभला आहे, हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी भूमिपूत्र असलेला खरा कोथरूडकर उमेदवार निवडून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेवर येईल असे सांगून ते म्हणाले की, यंदा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा आल्या असल्या तरी, पक्ष या सर्व जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडून येण्यासाठी आम्हाला सोन्याच्या रिंगा, पैशांची पाकिटे वाटावी लागणार नाहीत. ज्यांना भीती वाटते, त्यांनाच असे उद्योग करावे लागतात.
गेल्या दहा वर्षांत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा विकासच खुंटला असल्याचा आरोप चंद्रकांत मोकाटे यांनी या वेळी केला. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सलग आठ दिवस मी आंदोलन केले. या आंदोलनात माझ्याबरोबर कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेतले होते. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकात उड्डाणपुलाच्या कामाला गती देऊन उड्डाणपूल उभारला.
पण उद्घाटन प्रसंगी त्यांच्या श्रेय घेण्यावरून तू - तू मै-मै झाले. आपल्या कार्यकाळात कोथरूडमधील रस्त्यांचे रुंदीकरण, कर्वेनगरचा उड्डाणपूल अशी अनेक कामे केली. ससूनच्या धर्तीवरील छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने 800 खाटांचे सर्वोपचार रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या नावे स्वतंत्र हेड ओपन करून निधीची तरतूद केली. परंतु, नंतरच्या राज्यकर्त्यांनी हे काम पुढे सरकू दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी केक व पेढेही वाटण्यात आले.