नाशिक : पिंपळद येथे विहीरीत पडलेला बिबट्या बाहेर काढताना वन विभागाचे पथकpudhari
Published on
:
16 Nov 2024, 4:09 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:09 am
नाशिक : रासबिहारी लिंक रोडवरील मानेनगरमध्ये दगड, तारा बांधून बिबट्याला विहीरीत फेकल्याची घटना ताजी असतानाच नाशिक पश्चिम वनविभाग अंतर्गत येणार्या विल्होळी अन् पिंपळद शिवारात दोन बिबट्यांचा मृत्यू एकाचवेळीस उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विल्होळी शिवारातील बिबट्याचा मृत्यू आपापसातील झुंजीनंतर कुपोषणाने, तर पिंपळद शिवारातील बिबट्याचा मृत्यू शिकारीचा पाठलाग करताना विहीरीत पडून झाल्याचे वनाधिकार्यांनी सांगितले.
दोन बिबट्यांच्या झुंजीत दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास शिकार न मिळाल्याने त्याचा कुपोषणाने मृत्यू झाला. दुसर्या घटनेत पिंपळदमध्ये पाची डोंगराच्या पायथ्याशी फडोळ मळ्यात शिकारीसाठी रानडुकराच्या पाठीमागे धावताना ४ ते ५ वर्षे वयाचा नर बिबट्या विहीरीत पडला. विहीरीतून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने पाण्यातच बुडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी दिली.
विहिरीच्या परिसरात रानडुकराच्या पंजाचे ठसेही आढळून आल्याने बिबट्याच्या मृत्यूचा कयास लावला जात आहे. दोन्ही बिबट्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्यांचे दहन करण्यात आले.
मानेनगरमधील बिबट्याच्या हत्येचा लागेना तपास
मानेनगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या के. के. वाघ कृषी महाविद्यालयामागे असलेल्या विहिरीत २० ऑक्टोबर रोजी तार, दगड, सिमेंट पोल बांधून टाकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेला महिना होत आला तरी बिबट्याच्या मारेकर्यांचा तपास लागलेला नाही. यामुळे वनविभागाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ शवविच्छेदन आणि दहन करण्यापुरतेच वनविभागाचे काम उरले आहे का असा प्रश्न प्राणीमित्रांकडून केला जात आहे.
----------------------------------------
फोटो : बिबट्या नावाने सिटी 1 फोल्डरमध्ये सेव्ह केला आहे.
---------------------------------------