मालेगाव : रावळगाव येथे महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ आलेले विजय करंजकर व भुसे यांचा सत्कार करताना शिवसैनिक.(छाया : निलेश शिंपी)
Published on
:
16 Nov 2024, 4:09 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:09 am
मालेगाव : विरोधक माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. जर ड्रग्जमाफिया किंवा अशा गोष्टींशी माझा संबंध असेल, तर माझी व माझ्यावर आरोप करणार्यांची ‘ब्लड टेस्ट’ करा. माझ्या रक्तात अल्कहोलचा कणही आढळला, तर मी राजकारण सोडेन, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
सौंदाणे येथे शिवसेनेचे उपनेते तथा संपर्कप्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. ही जनता पैसे देऊन आणलेली नाही. आजवर केलेल्या कामाची ही पावती आहे. या लाडक्या बहिणीच 23 तारखेला विरोधकांचे डिपॉझिट जप्त करतील, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान या वर्षीही झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. मतदारसंघातील आदिवासी बांधवांसाठी तीन हजार घरकुल शबरी योजनेच्या माध्यमातून मंजूर झाली असल्याचे सांगत भुसे यांनी, आपण विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून, तोच माझा अजेंडा आहे. नार-पार नदीच्या पाण्यातून मालेगाव सुजलाम् सुफलाम् करायचा आहे. अजंग, रावळगाव एमआयडीसीमध्ये पाणी आणि विजेची व्यवस्था झाल्याने येत्या काळात या ठिकाणी आणखी काही कारखाने उभे राहिलेले दिसतील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दुप्पट मते हीच पोचपावती : करंजकर
मालेगाव बाह्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ सौंदाणे व रावळगाव येथे शिवसेनेचे उपनेते तथा संपर्कप्रमुख विजय करंजकर यांची सभा झाली. यावेळी करंजकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. भुसे यांनी मतदारसंघात केलेली कामे आणि झालेला विकास आपल्या समोर आहे. ज्या माणसाने खरंच कामे केली, त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताने निवडून द्या. तीच खरी कामाची पोचपावती असेल, असे करंजकर म्हणाले.