विधानसभेला गमंत करू नका नाही तर जंमत होईल:अजित पवार यांचे बारामतीकरांना आवाहन; म्हणाले - कुणात किती धमक याचा विचार करा

2 hours ago 1
लोकसभा निवडणुकीसारखी या निवडणुकीत गंमत करू नका, नाही तर तुमची जंमत व्हायची, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला या विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करताना म्हटले आहे. शरद पवारांनी दीड वर्षांनंतर आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तुमचे कोण काम करणार? कुणात काम करण्याची धमक आहे? याचा विचार करा, असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांना त्यांचा पुतण्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. या दोघा काका-पुतण्यातील लढाईकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अवघा मतदारसंघ पिंजून काढत मतदारांना या निवडणुकीत आपल्यामागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. ही निवडणूक शरद पवारांची आहे का? अजित पवार शनिवारी बारामती येथील मतदारांशी संवाद साधताना म्हणाले, मी प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीकाी करण्यास गेलो तर तो माझाच पुतण्या आहे. तो मला माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे मी त्याच्यावर टीका केली तर कुटुंबातीलच एखाद्या सदस्यावर टीका केल्यासारखे होईल. ते मला करायचे नाही. पण मतदारांनी भावनिक होऊन मतदान करू नये. तालुक्याच्या पुढाऱ्यांची नाराजी माझ्यावर काढू नये. आताच मला कुणीतरी सांगितले की, त्यांनी फक्त शरद पवारांचा भलामोठा फोटो लावला आहे आणि त्यावर त्यांचे चिन्ह लावले आहे. पण ही निवडणूक शरद पवारांची आहे का? हे लक्षात घ्या. ही निवडणूक शरद पवारांची नाही. तुम्ही लोकांनी लोकसभा निवडणुकीत थोडी गंमत केली, पण मी आता ते पुन्हा काढत बसत नाही. पण या विधानसभेला ती गंमत करू नका, नाही तर तुमची जंमतच होईल. हे मी खोटे सांगत नाही. अजित पवारांनी यावेळी शरद पवारांच्या कथित निवृत्तीवरूनही मतदारांना आपल्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले. शरद काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचे दीड वर्षे शिल्लक राहिली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा खासदार व्हायचे की नाही याचा विचार करणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून विविध तर्कवितर्क मांडले जात असताना अजित पवारांनीही त्यावर भाष्य केले आहे. तुमचे कोण करेल? कुणात तेवढी धमक आहे? ते म्हणाले, समोरचे लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही भावनिक झालात तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. पुन्हा बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. शरद पवारांनी आपण दीड वर्षांनंतर पुन्हा उभे राहणार नसल्याचे सांगितले आहे. ते निवडणूक लढवणार नाहीत. त्यानंतर तुमचे कोण पाहणार? कुणात तेवढी धमक आहे? कुणात तेवढी ताकद आहे याचा विचार करा. माझ्या कारकिर्दीत मी पाण्याच्या बाबतीत या भागाला स्वयंपूर्ण केले आहे. भविष्यातही मला या भागाचा विकास करायचा आहे. शरद पवारांनी आपल्या 24 वर्षांत पाझर तलाव आदी गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून आपला प्रश्न सुटला नाही, असे ते म्हणाले. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांवरही टीका अजित पवार यांनी यावेळी युगेंद्र पवार यांचा प्रचार करणाऱ्या शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मला तुम्ही 1991 पासून आमदार - खासदार केले. पण प्रतिभाकाकी केव्हाही बाहेर आल्या नाही. पण आत्ता त्या घरोघरी फिरत आहेत. त्यांना एवढा काय नातवाचा पुळका आला हे माहिती नाही. पण मी खाताडा, पैताडा, गंजेंटी असो तर गोष्ट वेगळी होती. मी बारामतीचे वाटोळे केले असते, पार बाद झालो असतो तर गोष्ट वेगळी असती. निवडणूक झाली की मी काकींना याविषयी विचारेल. हे विचारण्याची वेळ आत्ता नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article