Published on
:
16 Nov 2024, 4:16 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:16 am
नाशिक : दि. नासिक मर्चन्ट्स को-आॅपरेटीव्ह बँकेच्या मालेगाव शाखेत दीड महिन्यांच्या अंतराने उघडण्यात आलेल्या १२ चालू खात्यांवर तब्बल ९८ कोटींचे व्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर, पोलिस व इतर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीला बँक सामोरे जात असतानाच बँक व्यवस्थापनाने शाखा व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, बँकेतील सर्व व्यवहार सुरळीत असून, या प्रकरणामुळे बँकेचे कुठलेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे स्पष्टीकरण बँक अध्यक्ष सोहनलाल भंडारी व ज्येष्ठ संचालक हेमंत धात्रक यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
मालेगावच्या लोढा मार्केट येथील नामको बँकेत सप्टेंबर व आॅक्टोबर या महिन्यात तब्बल १२ खाते उघडण्यात आले. या खात्यावरून तब्बल ९८ कोटींचे विविध राज्यातील बँकांमध्ये व्यवहार करण्यात आले. सिराज नामक व्यापाऱ्याने मालेगाव मार्केट कमिटीमध्ये नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून या तरुणांकडून कागदपत्रे गोळा करून खाते उघडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणी ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँकेसह इतर यंत्रणांनी तपास सुरू केल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष भंडारी, उपाध्यक्ष आकाश छाजेड, संचालक हेमंत धात्रक यांनी शुक्रवारी (दि. १५) पत्रकार परिषद घेत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले.
पॅनकार्ड, आधारकार्ड, व्यवसायाचे दाखले देणाऱ्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीच्या आधारे खाते उघडण्यात आलेत. मात्र, पत्रव्यवहार करीत असताना यात शाखास्तरावर अनिमितता आढळून आली आहे. त्याची अंतर्गत तसेच पोलिस व इतर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. या संदर्भात सुरू असलेल्या चौकशीला बँक सामोरे जाताना व या रक्कमा येण्या-जाण्यातून बँकेचे कोणतेही नुकसान झालेली नाही. त्यामुळे आम्ही सर्व ग्राहकांना आश्वस्त करू इच्छितो की, बँकेने या प्रकरणी अंतर्गत चौकशी देखील सुरू केली असून, याप्रकरणी शाखाव्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक यांना निलंबित केले आहे. तसेच या संदर्भात ज्या यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे, त्या सर्व यंत्रणांना बँकेकडून सहकार्य केले जात असल्याचे यावेळी अध्यक्ष भंडारी यांनी सांगितले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित उपस्थित होते.
याप्रकरणी बँकेला २१ आॅक्टोबर २०२४ रोजी माहिती प्राप्त होताच फायनान्शीयल इन्क्लुजन इंडिया व केंद्र सरकारच्या सायबर क्राइमच्या संकेतस्थळावर स्वत: तक्रार दाखल केली. ज्या २२ बँकांमधून आरटीजीएस व एनईएफटीचे व्यवहार झालेले आहे, त्या सर्व बँकांना माहिती पुरविण्याचे काम देखील नामको बँकेनेच केल्याचेही अध्यक्ष भंडारी यांनी स्पष्ट केले.
या खात्यांमधून झालेल्या व्यवहाराचे पैसे 'व्होट जिहाद'साठी वापरल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी त्यांनी तक्रार देत चौकशीची मागणी केल्याने राज्यभरू खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब समोर आल्याने, यंत्रणांकडून याप्रकरणी कसून तपास केला जात आहे.
--