नाशिक : कार्तिकीपौर्णिमेनिमित्त श्री कार्तिकस्वामी मंदिरात दर्शनासाठी झालेली गर्दी. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
:
16 Nov 2024, 4:22 am
नाशिक : शहर-परिसरात कार्तिकी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गोदाघाटावर स्नानासाठी गर्दी झाली. या दिवशी देवदिवाळी साजरी करण्याचे महत्त्व आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी दिवे प्रज्वलित करण्यात आले. तसेच पंचवटीतील श्री कार्तिकस्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली.
कार्तिकीपौर्णिमेला (Tripurari Purnima) भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे देवतांनी कार्तिकीपौर्णिमेला आनंदाने दिवाळी साजरी केली. तेव्हापासून कार्तिकीपौर्णिमेला ‘देव दिवाळी’ म्हटले जाऊ लागले. कारण दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर आले, अशी मान्यता आहे. यानिमित्ताने दिवे प्रज्वलित करतानाच स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
कार्तिकस्वामींची मूर्ती. (छाया : हेमंत घोरपडे)
शहरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. रामकुंड व गोदाघाटावर स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली. त्यानंतर पंचवटीमधील श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी भाविक रवाना होत होते. त्यामुळे मंदिर-परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच विविध मंदिरांमध्ये सायंकाळनंतर दिवे प्रज्वलित करून देव-दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी हजारो दिवे प्रज्वलित करीत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, निरनिराळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून नेटिझन्सने एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.