Published on
:
16 Nov 2024, 2:22 am
Updated on
:
16 Nov 2024, 2:22 am
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उपनगरांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मंजूर केलेला 60 कोटींचा निधी अन्यत्र वळवण्याचे पाप महाडिकांनी केले. विकासकामांमध्ये अडथळे आणणार्या महाडिकांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ क्रशर चौक येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती.
आ. सतेज पाटील म्हणाले, आपला आमदार सुसंस्कृत आहे, तो प्रत्येकाशी नम्रपणे वागतो आणि जनतेची कामेही ताकदीने करतो. प्रत्येकाला अभिमान वाटावा, असा आमदार आपल्याला लाभला आहे. दक्षिणच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनाच विजयी करा.
मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, सामान्यांची मुले शिकावीत, जीवनात यशस्वी व्हावीत व त्या माध्यमातून सक्षम पिढी घडावी हा राजर्षी शाहू महाराजांचा विचार आ. ऋतुराज पाटील आपल्या कामातून पुढे घेऊन जात आहेत. सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचा विकास साधणारे नेतृत्व असलेले आमदार ऋतुराज पाटील यांना मताधिक्याने निवडून आणूया.
शिवसेना शिंदे गटाचे तानाजी इंगळे यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. यासह एस. टी. महामंडळ कर्मचारी संघटना, पुईखडी ऑक्सिजन पार्क कार्यकर्ते आणि शामराव गवळी यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा व्यक्त केला.यावेळी माजी नगरसेवक भरत लोखंडे, अभिजित चव्हाण, संजय सावंत, माजी नगरसेविका संगीता सावंत, प्रसन्न पडवळे, सुयोग मगदूम, सुनील देसाई, सदानंद कवडे, प्रा. टी. एस. पाटील, उदय गायकवाड, कुलदीप सावतकर, डॉ. जे. के. पवार, गुरुप्रसाद जोशी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.