Published on
:
16 Nov 2024, 12:03 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:03 am
मंगळवेढा : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खा. प्रणिती शिंदे यांना ज्या पद्धतीने निवडून दिले. तसेत एक भाऊ म्हणून भगीरथ भालके यांच्या पाठीशी राहा. माझ्यासोबत त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन विश्वजित कदम यांनी केले. वाखरी येथे झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी खा. प्रणिती शिंदे, उमेदवार भगीरथ भालके, प्रशांत साळे, मोहन कोळेकर, किरणराज घाडगे, समाधान काळे, सुमित शिंदे, राहुल घुले उपस्थित होते.
पुढे बोलताना विश्वजित कदम म्हणाले की, राज्यातील परिस्थिती विदारक असून यातून महाराष्ट्राला काँग्रेस बाहेर काढू शकते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून भारत भालके यांनी ज्या पद्धतीने पंढरपूर मतदारसंघामध्ये काम केले त्यांचा वारसा घेऊन भगीरथ भालके पुढे काम करतील. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका नेहमीच काँग्रेसने घेतली आहे. देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. या महाराष्ट्राची जडणघडण काँग्रेसच्या काळात झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये पिछेहाट झाली आहे. युवकांना नोकर्या नाहीत. महाविकास आघाडीने ‘महालक्ष्मी’ योजना आणली आहे. याचा महिलांना फायदा होणार आहे. राज्यातील शेतकर्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
यावेळी खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राज्यातील भ्रष्ट भाजप सरकार आपल्याला घालवायचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या भागातील सर्व प्रश्न सोडवले जाणार आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्याचे काम माझे होते, ते मी पार पाडले आहे. आता लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्याने भगीरथ भालके यांना विधानसभेत पाठवायचे आहे आणि आपल्या हक्काचा माणूस मतदारसंघामध्ये निवडून आणायचा आहे.
उमेदवार भगीरथ भालके म्हणाले की, माझी लढाई ही भाजपच्या विरोधात असून इथल्या लोकप्रतिनिधींनी गेल्या साडेतीन वर्षांत अनेक गावांना निधी देताना दुजाभाव केला आहे. पंढरपूर तालुक्यातले अनेक प्रश्न तसेच राहिले आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. या भागातील शेतकर्यांची कोणतीही कामे झाली नाहीत. लोकप्रतिनिधी या भागांमध्ये फिरकले नाहीत. त्यामुळे जनतेने याबाबत निर्णय घेऊन मला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले.
शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर शहरप्रमुख सुमित शिंदे यांनी वाखरी येथील सभेमध्ये भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.