Maharashtra Assembly Polls | बोराटवाडीत राहून मतदारसंघातील कामे तुम्हाला जमेनात
कलेढोण येथील प्रचारसभेत बोलताना प्रभाकर घार्गे, समोर उपस्थित जनसमुदाय.Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 12:26 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:26 am
कलेढोण : चाळीस वर्षांपासून कै. हणमंतराव साळुंखे व शरदचंद्र भोसले गटाशी तसेच कलेढोणकरांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी चंद्रावर असलो, तरी पृथ्वीवरची कामे करतो. तुम्ही बोराटवाडीत राहून मतदार संघातील कामे करत नाही. माझं सगळं व्यवस्थित चाललंय. तुमच्या पोटात विनाकारण का दुखतंय? असा टोला माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार प्रभाकर घार्गे यांनी विरोधकांना लगावला.
मायणी गटातील विविध गावांत प्रचारादरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, रणजितसिंह देशमुख, अनिल पवार, सूर्यभान जाधव, संजिव साळुंखे, चंद्रकांत पवार, राजूशेठ जुगदर, बाळासाहेब माने, हिम्मतराव देशमुख, विनोद देशमुख, संतोष ढोकळे, मजनू मुलाणी, महेश पाटील, प्रकाश लिगाडे, मारुती दबडे, राजू नायकुडे, मुरलीधर भुषारी, मुरलीधर तरसे उपस्थित होते.
प्रभाकर घार्गे म्हणाले, माझे सगळे सुरळीत चालले असताना विरोधकांना माझा का प्रश्न पडलाय? मी जरी चंद्रावर असलो, तरी पृथ्वीवरची कामे करतो. मी खटाव-माण तालुक्यातील शेतकर्यांसाठी पडळ साखर कारखाना उभा केला आहे. मे महिन्यात खटाव-माण स्टिल कारखाना काढला आहे. वडूजला कोल्ड स्टोरेज काढले आहे. मित्राने वाटोळे केलेला इथेनॉल प्रकल्प पुन्हा सुरु केलाय. या सर्व प्रकल्पात काम करणार्या लोकांना मी रोजगार दिलाय. त्यामुळे कोणताही उद्योग न उभा करणार्यांनी माझ्यावर बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुरेंद्र गुदगे म्हणाले, घार्गे हे स्थानिक उमेदवार व हक्काचा उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. त्यांना सगळ्याच गावातून चांगले मताधिक्य मिळणार आहे. संजिव साळुंखे म्हणाले, मी राजकारणात वैयक्तिक टीकेला महत्व देत नाही. घार्गे हे सक्षम उमेदवार असून त्यांना प्रत्येक गावातील मुख्य दोन गटातून चांगला पाठिंबा देत आहेत.
युती शासनाकडून शेतकर्यांची अडवणूक : देशमुख
प्रभाकर देशमुख म्हणाले, शरद पवार यांनी शेतकर्यांची कर्जमाफी करुन देशाचा शेतकरी जगवला. मात्र, राज्य व केंद्र सरकारची भूमिका ही शेतकर्याला काहीतरी देण्यापेक्षा त्याची अडवणूक करण्याची आहे. जलनायक म्हणवून घेणार्याला अजूनही मंजूर झालेले पाणीही वापरता येत नाही.